मुंबई

मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना मुंबईत आणू, हक्काचे घर देऊ -खासदार श्रीकांत शिंदे

मुंबई – रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पातील अडचणी दूर झाल्याने घरांचा प्रश्न मार्गी लागेल आणि मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू , अशी ग्वाही शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. जनसंवाद यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यात खासदार डॉ. शिंदे यांनी आज उत्तर-पश्चिम आणि उत्तर मुंबईमधील विधानसभा मतदार संघांचा आढावा घेतला.यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

खासदार डॉ. शिंदे पुढे म्हणाले की, मागाठाणेमध्ये घरांचा प्रश्न मोठा असून येथे ‘एमएमआरडीए’ आणि ‘एसआरए’ने एकत्रपणे योजना सुरु केली आहे. तसेच एमएमआरडीए आणि एसआरए यांच्या संयुक्त विद्यमाने माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर झोपडपट्टीचे पुनर्वसन केले जाणार आहे. मागील काही वर्षात एसआरएमध्ये भ्रष्टाचार झाला, काहीजण तुरुंगात आहेत तर अनेक बिल्डर फरार आहेत. त्यामुळे लोकांना त्यांची हक्काची घरे मिळाली नाहीत. या प्रकल्पांची जबाबदारी सरकारने घेतली असून लाखो मुंबईकरांना हक्काचे घर मिळवून देऊ. आतापर्यंत सरकारने २२७ एसआरए प्रकल्प मार्गी लावले आहेत. मराठी माणसाला मुंबईत परत आणण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. गेली अनेक वर्षे ज्यांनी मुंबईत सत्ता गाजवली त्यांनी मात्र मुंबईकरांसाठी काहीच केले नाही, अशी टीका खासदार डॉ. शिंदे यांनी उबाठावर केली.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने शिवसेनेची सध्या राज्यभर जनसंवाद यात्रा सुरु आहे. पक्ष संघटन वाढवण्याच्या दृष्टीने ⁠कार्यकर्ते, पदाधिकारी, शाखाप्रमुखांशी चर्चा करणे तसेच ⁠सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचल्या का,याचाही यात आढावा घेण्यात येत आहे. शिवसेना घोडदौड करत असून विधानसभेत जास्तीत जागा निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला यश मिळाले आहे. तसेच ३० सप्टेंबरपर्यंत ३ कोटी बहिणी या योजनेचा लाभ घेतील, असा विश्वास खासदार डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला. आतापर्यंत १ कोटी ६० लाख बहिणींना पैसे मिळालेत. ⁠ज्यांनी उशीरा अर्ज केला त्यांना एकत्रित ४ हजार ५०० रुपये मिळतील, असे त्यांनी यावेळी सांगितले. या योजनेला विरोध करणाऱ्या काँग्रेसचा महिलाविरोधी चेहरा समोर आला असून लाडकी बहिण योजनेविरोधात ते कोर्टात गेले. मात्र ही योजना योग्य असल्याचा निर्वाळा देत न्यायालयाने विरोधकांना चपराक लगावली. आंनदांचा शिधा रोखण्यासाठीही विरोधक सर्वोच्च न्यायालयात गेले तिथेही न्यायालयाने त्यांना फटकारले. गरिबांना गरिबच ठेवायचे, असे काँग्रेसचे धोरण असल्याची टीका खासदार डॉ. शिंदे यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!