भाजपाच्या राम नाईकांच्या प्रयत्नांमुळेच बॉम्बेचे मुंबई झाले हे राज ठाकरेंनी विसरू नये भाजपाचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची प्रखर टीका

मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे वास्तव आणि तथ्यांची तपासणी न करता हवेत बाण सोडल्यासारखी टीका करत आहेत. बॉम्बेचे मुंबई असे नामकरण युती सरकारच्या काळात भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे शक्य झाले, हे राज ठाकरे यांनी विसरू नये, असा टोला भारतीय जनता पार्टीचे प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी बुधवारी लगावला. जेव्हा-जेव्हा मुंबईमध्ये निवडणूक लागते तेव्हा महाराष्ट्रापासून मुंबई तोडणार असा बागुलबुवा विरोधकांकडून उभा केला जातो आणि भारतीय जनता पार्टीला लक्ष्य केले जाते. मात्र मुंबई महाराष्ट्रापासून कुणीही तोडू शकत नाही. मुंबईचे नामांतर कुणीही करू शकत नाही. उद्धव ठाकरे यांच्या पावलावर पाऊल ठेवत राज ठाकरे यांची भाषा बदलली असून त्यांना यू-टर्न घेण्याची सवय जडली आहे, असेही बन म्हणाले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
बन म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारच्या पाठिंब्याने मुंबईमध्ये विविध विकास प्रकल्प आणले आहेत. मुंबईला विकासापासून दूर ठेवण्याचे काम उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना करण्यात आले. काही लोकांना मुंबईचा होत असलेला विकास बघवत नाही त्यामुळे राजकीय मळमळ वाढल्याने वास्तवाचे भान न ठेवता उठसूठ टीका केली जात आहे. मात्र मराठी माणूस आणि मुंबईकर हा सूज्ञ असून अशा फुकाच्या टीकेकडे तो लक्ष देत नाही. मतदारांना विकास हवा आहे आणि विकास हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारच घडवू शकते हा विश्वास त्यांना आहे असे बन यांनी नमूद केले.
काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांच्या अपहरण प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुतीचे सरकार निश्चितपणे त्यावर कारवाई करेल. फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये गुंडाराजला थारा नाही. फडणवीस हे पोशिंदे आहेत तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळच खरे दरिंदे आहेत. हर्षवर्धन सकपाळ यांना बुलडाण्याशिवाय कोणी ओळखत नाही. त्यांची मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका करण्याची लायकी नाही असा घणाघात बन यांनी केला.
सुजात आंबेडकर यांच्यावर पलटवार करत बन म्हणाले की, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाचे कौतुक केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा हा इतिहास सुजात सोईस्करपणे विसरले आहेत. सुजात यांनी संघाच्या शाखेत जाऊन भेट द्यावी म्हणजे त्यांना राष्ट्रभक्ती काय असते ते कळेल असा टोलाही त्यांनी लगावला.
मतदार यादीतील घोळाचा मुद्दा भारतीय जनता पार्टीनेही उचलला होता. पण निवडणूक पुढे ढकला, असे आम्ही कधीच बोललो नाही असे म्हणत बन यांनी आ. रोहित पवारांना लक्ष्य केले. रोहित पवार आता घाबरून पळ काढत आहेत अशी टीकाही त्यांनी केली.
संविधानाला काळा डाग काँग्रेसमुळे लागला – नवनाथ बन
आज संविधान दिन आहे. पंतप्रधान मोदींनी हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला होता याची आठवण करून देत बन म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्याचे आज युनेस्को मुख्यालयामध्ये अनावणार होत आहे ही राज्यातील आणि देशातील प्रत्येकासाठी अभिमानाची बाब आहे. आणीबाणी लादण्याचे काम इंदिरा गांधी यांनी केले असून संविधानाला काळा डाग काँग्रेसमुळे लागला हे विसरून चालणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरेंनी नवे मुद्दे शोधावेत
‘लांडगा आला रे आला…’ गोष्टीतल्या मेंढपाळासारखी राज ठाकरे यांची अवस्था झाली आहे. तुमच्या आणि उबाठांच्या ‘मुंबई तोडणार’ च्या रडारडीला मराठी माणूस वैतागला आहे. ‘मुंबईला तोडणार’ च्या कांगाव्याला मराठी माणूस भुलणार नसल्याने राज ठाकरे यांनी नवे मुद्दे शोधावेत, असेही बन म्हणाले.





