भाजपा युवामोर्चा पदाधिकारी मारहाण प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह 4 कर्मचारी निलंबित
जालना,दि.२९:भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस शिवराज नारीयलवाले यांना अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह 4 पोलीस कर्मचाऱ्यांना शुक्रवारी (दि. 28) तडकाफडकी निलंबीत करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी याबाबत आदेश काढले आहेत.
शहरातील दीपक हॉस्पिटलमध्ये (दि.7) एप्रिल रोजी तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्यासह ईतर कर्मचाऱ्यांनी शिवराज नारीयलवाले यांना अमानुषपणे मारहाण केल्याच्या व्हिडियो सोशल मीडियावर गुरूवारी (दि. 27 मे) रोजी वायरल झाला होता़ याप्रकरणी सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्यामार्फत चौकशी सुरू होती. अखेर शुक्रवारी पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी पोलीस उपनिरीक्षक भागवत कदम, पोलीस कर्मचारी सोमनाथ लहानगे, नंदकिशोर ढाकणे, सुमित सोळंके, महेंद्र भारसाकळे यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहे. दरम्यान या व्हिडियोमध्ये दिसणारे निलंबीत उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर आणि पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांचा अहवाल औरंगाबाद पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला असून उद्या त्यांच्यावर कारवाईची शक्यता आहे.
काय आहे मूळ प्रकरण?
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा जीव गेल्याचा आरोप करत महिनाभरापूर्वी एका रुग्णालयात जाब विचारणारे भाजपचे सरचिटणीस शिवराज नारियलवाले यांना जालना पोलिसांनी लाठ्या तुटेपर्यंत बेदम मारहाण केली होती. हा प्रकार गुरुवारी समोर आला होता. अमानुष मारहाणीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. त्यात नारियलवाले ‘साहेब माफ करा’, साहेब माफ करा अशी विनवणी करत असतानाही जवळपास पाच ते सहा पोलीस कर्मचारी लाठ्यानी त्यांना बेदम मारहाण करताना दिसत आहे.
शिवराम नारियलवाले यांच्या एका नातेवाईकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत काही तरुणांनी रुग्णालयात महिनाभरापूर्वी गोंधळ घातला होता असे पोलिसांचे म्हणणे आहे. लाचेच्या प्रकरणात अटक झालेले तत्कालीन पोलीस उपअधीक्षक आणि जालना पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी लाठ्यांचा तुफान मारा केला. भाजपचे कार्यकर्ते रुग्णालयात धुडघूस घालत असल्यानेच त्यांना अटकाव करण्यासाठी हा लाठीमार केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.