ठरलं : शिर्डी देवस्थान राष्ट्रवादीला, पंढरपूर काँग्रेसला-महामंडळाचे वाटप १५ दिवसात होणार
मुंबई : महाविकास आघाडी सरकाराचे दिड वर्ष रखडलेल्या महामंडळ वाटपास अखेर मुहूर्त मिळाला. महाविकास आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीत विधानसभेतील संख्याबळानुसार महामंडळ वाटपाचे सूत्र निश्चित झाले आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली. बैठकीनंतर बोलताना शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, महामंडळ वाटपसंदर्भात बैठकीत चर्चा झाली, लवकरच तीन पक्षांना महामंडळाचे वाटप होईल. आमदारांच्या संख्येप्रमाणे वाटप होईल. छोट्या घटक पक्षांना यात वाटा दिला जाणार आहे.
मुंबईतील सिध्दिविनायक देवस्थान शिवसेनेकडे आहे, ते तसेच राहणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी साईबाबा देवस्थान अध्यक्षपद राष्ट्रवादीला तर पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी देवस्थान अध्यक्षपद काँग्रेसकडे देण्याचे निश्चित झाले आहे. शिर्डी देवस्थानवर काँग्रेसने हक्क सांगितला होता.
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्राबाबत महाविकास आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीत चर्चा झाली नसल्याचे शिंदे म्हणाले. काही महामंडळाचा निर्णय झाला आहे. काहींवर मतभेद आहेत. मात्र मुख्यमंत्री त्यावर लवकरच अंतीम शिक्कामोर्तब करतील, असे शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले.
मंत्रीपद न मिळालेल्या तसेच विधानसभा उमेदवारी न मिळालेल्या नाराज नेत्यांचे पुनर्वसन करण्यासाठी सरकारला महामंडळाचा मोठा आधार असतो. राज्यात ५० पेक्षा अधिक महामंडळे आहेत. या महामंडळावर अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य अशी नेते व कार्यकर्ते यांची वर्णी लावली जाते. तसेच सरकारला सामाजिक कामांमध्ये आर्थिक मदतही महामंडळे करत असतात.
सरकार अस्थिर असण्याच्या एकीकडे चर्चा आहेत, दुसरीकडे महामंडळ वाटपाचा प्रश्न मार्गी लागल्याने महाविकास आघाडीला बळ मिळणार आहे. महामंडळे सरकारने ताब्यात न ठेवता ती भक्तांच्या हाती सोपवावी, अशी वारकऱ्यांची मोठी मागणी गेली अनेक वर्षे आहे.