बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेचे लोकार्पण

मुंबई- बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या विविध ८० पेक्षा अधिक सेवा-सुविधांची माहिती नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअपद्वारे, ८९९९-२२-८९९९ या व्हॉट्सअप क्रमांकावर अत्यंत सहजपणे उपलब्ध होणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेचे लोकार्पण आज (शुक्रवार) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी वस्त्रोद्योग मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री असलम शेख, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, लोकप्रतिनिधी व मनपा पदाधिकारी, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे आणि व्हॉटस् ॲपचे संचालक (सार्वजनिक धोरणे) शिवनाथ ठुकराल आदी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे याप्रसंगी उपस्थित होते. कोविड १९ विषाणू संसर्ग परिस्थितीमुळे, हा कार्यक्रम पूर्णतः दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडला.
‘मला अभिमान आहे ही आपली मुंबई, माझी मुंबई ही देशातील क्रमांक एकची महापालिका आहे. क्रमांक एकचं शहर आहे. या पद्धतीने जनतेची साधी-साधी कामं होत आहेत. तंत्रज्ञानाचा उपयोग जर सर्वसामान्यांना होत नसेल, तर मग त्याचा काहीही उपयोग नाही, असं मी मानतो. म्हणून मला अभिमान वाटतोय की, माझी महापालिका या तंत्रज्ञानाचा वापर सर्वसामान्यांच्या आयुष्यात सहजता आणण्यासाठी करते, हे एक खूप मोठं काम आहे’, असं यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवलं.