लसीकरणाबाबत मुंबईकरांसाठी महापौर पेडणेकरांचं आवाहन,म्हणाल्या…
मुंबईत एकूण ३७ ठिकाणी आज लसीकरण सुरू
मुंबई : मुंबईत काही ठिकाणी लसीकरण बंद पडल्याच्या तक्रारी आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबईतल्या लसीकरणाविषयी माहिती दिली आहे. “मुंबईत ७ खासगी रुग्णालये आणि ३० सरकारी रुग्णालये आणि केंद्र अशा एकूण ३७ ठिकाणी आज लसीकरण सुरू आहे”, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. तसेच, लसींचा साठा टप्प्याटप्प्याने केंद्रावर दाखल होतो. त्यामुळे “लोकांनी आधी चौकशी करूनच लसीकरण केंद्रांवर गेल्यास त्यांची केंद्रावर जाऊन होणारी धावपळ टाळता येईल”, असं ही महापौर म्हणाल्या.
“आपण प्रत्येक वेळी सगळ्यांना दाखवतोय की आपल्याकडे इतकाच साठा आहे. लोकांनी लस घेण्यासाठी जाताना आधी खात्री करुन जायला हवं. लसींचा साठा सकाळी १० वाजता येतो आणि त्यानंतर रुग्णालय, केंद्रांवर जातो. लोकं जर त्याबाबत विचारपूर करून गेले, तर त्यांची धावपळ कमी होईल. १ मे पासून आपण १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरण करणार आहोत. यासाठी सर्वच स्तरावर नियोजन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. लसीकरणाचा साठा जसा पोहोचेल, त्यानुसार टप्प्यांनुसार प्रथम येणाऱ्यास प्राधान्य अशा पद्धतीने लसी दिल्या जातील. उपलब्ध लसींचा साठा देखील बोर्डवर दाखवला जाईल. त्यानुसार लोकांनाही कळू शकेल. अनेक ठिकाणी असं घडतंय की ३००-३५० लोकांचं लसीकरण झालं की साठा संपतो आणि मग उरलेल्या लोकांचे वाद होतात”, असं महापौरांनी यावेळी सांगितलं.
मुंबईत या रुग्णालयांत सुरू आहे लसीकरण!
यावेळी बोलताना महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईत लसीकरण सुरू असलेल्या खासगी आणि सरकारी किंवा पालिकेच्या रुग्णालय आणि केंद्रांची यादीच सादर केली. यात मुंबईत मित्तल रुग्णालय, क्रिटिकेअर रुग्णालय, तुंगा रुग्णालय, लाईफलाईन मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल, शिवम रुग्णालय, कोहिनूर रुग्णालय एनलॉक्स रुग्णालय या खासगी रुग्णालयांमध्ये आजही लसीकरण सुरू आहे. पालिकेच्या माध्यमातून जेजे रुग्णालय, बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय.
वाचा : चिंतेत भर : देशात २४ तासांत ३ लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण सापडले, २७६७ मृत्यू!
कस्तुरबा रुग्णालय, केईएम रुग्णालय, टाटा रुग्णालय, एसएआयएस रुग्णालय, व्ही. एन. देसाई रुग्णालय, भाभा रुग्णालय, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटर, कूपर रुग्णालय, टोपीवाला रुग्णालय, गोकुळधाम प्रसुतीगृह, मीनाताई ठाकरे लसीकरण केंद्र, सखापाटील रुग्णालय, मालवणी सरकारी रुग्णालय, चोक्सी प्रसूतीगृह, आप्पापाडा प्रसूती रुग्णालय, आंबेडकर रुग्णालय, आकुर्ली प्रसूतीगृह, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय, शताब्दी रुग्णालय, मा रुग्णालय अशा सरकारी आणि पालिकेच्या रुग्णालयांमध्ये मोफत लसीकरण सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
…तर वस्तीत जाऊन कोविन अॅपवर नोंदणी
दरम्यान, यावेळी त्यांनी पालिकेकडून मुंबईत घरोघरी लसीकरणाचा सध्यातरी कोणताही विचार नसून वस्तीस्तरावर लसीकरण करण्याचा प्रयत्न पालिकेकडून सुरू असल्याचं सांगितलं. “१ मेपर्यंत जर मुबलक लसींचा साठा आला, तर वस्तीत जाऊन कोविन अॅपवर नोंदणी करून कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून लसीकरण करता येऊ शकेल. त्यासंदर्भात आम्ही विचार करतो आहोत. सध्या तरी घरोघरी जाऊन लसीकरण करण्याचा आमचा विचार नाही. वस्ती पातळीवर जाऊन नोंदणी करूनच त्यांना लस देण्याचा विचार पालिका करत आहे. केंद्र सरकारच्या अॅपच्या माध्यमातूनच लस दिली जाईल”, असं त्या म्हणाल्या.