सलमान विरोधात कारवाई करा, बिष्णोई समाजाची थेट पंतप्रधानांकडे मागणी

मुंबई – अभिनेता सलमान खानसाठी काळवीट शिकार प्रकरण गंभीर बनले आहे. या प्रकरणात बिष्णोई समाज सलमानवर संतापला आहे. आधी त्यांनी सलमानने त्यांच्या मंदिरात येऊन माफी मागावी, अशी मागणी केली होती, मात्र आता त्यांनी माफी नाकारत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री आणि कायदेमंत्र्यांकडे सलमान विरोधात तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
बिष्णोई समाजासाठी काळवीट पूजनीय असून, सलमानविरुद्ध कारवाई न झाल्यास समाज संतप्त राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. बिष्णोई समाजाचे अध्यक्ष देवेंद्र बिष्णोई यांनी सांगितले की, “सलमान आणि त्याचे वडील खोटं बोलत आहेत. आमच्या समाजात खोटं बोलून कोणीही वाचू शकत नाही.” त्यांनी माफीच्या सर्व मागण्यांना फेटाळले आहे आणि आता जलद सुनावणीची मागणी केली आहे.
लॉरेन्स बिष्णोई गँगने सलमानला जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सलमानच्या वडिलांनी मुलाखतीत सांगितले होते की सलमानने शिकार केली नसल्याने माफी मागण्याचा प्रश्नच नाही. मात्र, सलमानची माजी मैत्रीण सोमी अलीने दावा केला होता की सलमानने तिला स्वतः शिकार केल्याचे सांगितले होते. बिष्णोई समाजाच्या या मागणीने प्रकरण अधिक गंभीर बनले असून, समाजाने आता कोणतीही माफी स्वीकारण्यास नकार दिला आहे.