मृत्यूप्रकरणी एस आय टी चौकशीची मागणी

मुंबई / रमेश औताडे
सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा २४ ऑक्टोबर रोजी झालेला संशयास्पद मृत्यू किंवा आत्महत्येप्रकरणी राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. मृत्यूपूर्वी तिने हातावर लिहिलेल्या नोंदीनुसार दोन पोलीस अधिकाऱ्यांकडून लैंगिक छळ झाल्याचे आरोप समोर आले आहेत.या सर्व प्रकरणाची SIT चौकशीची मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी महासंघाने शासनाकडे केली असल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष डॉ. अरुण कोळी यांनी दिली.
महासंघाने या प्रकरणात कॅमेरा फुटेज, कॉल रेकॉर्ड व चॅट डेटा तातडीने जप्त करण्याची तसेच पोस्टमार्टम जिल्ह्याबाहेरील तज्ज्ञ पॅनेलकडून व्हिडिओग्राफीसह करावे, वैद्यकीय अधिकाऱ्यांवर एम एल सी अथवा पोस्टमार्टम अहवाल बदलण्यासाठी कोणताही दबाव आणल्यास तो दंडनीय गुन्हा ठरावा, अशा प्रकारचा शासन निर्णय तातडीने काढावा, वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी कामाचे तास निश्चित करण्याचे, संबंधित कायद्यानुसार तक्रार निवारण समित्या सक्रिय करण्याचे, तसेच डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी विशेष कायदा करावा. शासनाने तातडीने लक्ष न दिल्यास राज्यभर आंदोलनाचा इशारा महासंघाने दिला आहे.






