मोठी बातमी! मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने अशोक चव्हाणांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शनं,पोलीस-कार्यकर्त्यांमध्ये झटापट

मुंबई:- मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच मराठा उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या घराबाहेर आंदोलन करण्यात आलं. काही महिन्यांपूर्वी मंत्री अशोक चव्हाण यांनी मराठा समाजातील तरुणांना वसतिगृह देऊ अशी घोषणा केली होती. मात्र,अद्यापही वसतिगृह न दिल्यामुळे मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने त्यांच्या मेघदूत त्या मुंबईतील शासकीय निवासस्थानाबाहेर हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी अशोक चव्हाण यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली. ‘दिलेली आश्वासनं पूर्ण करा, अन्यथा खुर्ची खाली करा’, अशा घोषणा देत मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मेघदूत निवासस्थानाबाहेर मोठी निदर्शनं केली.
यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त मेघदूत निवासस्थानाबाहेर लावण्यात आला होता. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांचे आक्रमक रूप पाहून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यावर मंत्री अशोक चव्हाण आता काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.