कोंकणमहाराष्ट्रमुंबई

राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली भेट

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मदत आणि बचावकार्यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्क रहावे - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आष्टी तालुक्यात पुरामुळे अडकलेल्या ४० जणांना एअरलिफ्ट करण्याचे दिले निर्देश

मुंबई : मुंबईसह राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दुपारी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला भेट देऊन पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. बीड जिल्ह्यातील आष्टी पाथर्डी तालुक्यातील काही गावांना पुराच्या पाण्याने वेढल्याने अडकलेल्या ४० ग्रामस्थांना एनडीआरएफच्या मदतीने एअरलिफ्ट करून सुरक्षित ठिकाणी हलवावे असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. अतिवृष्टी असलेल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी यावेळी त्यांनी संवाद साधत मदत आणि बचावकार्याबाबत माहिती घेतली आणि जिल्हा प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना दिल्या.
दुपारी बाराच्या सुमारास उपमुख्यमंत्र्यांनी या कक्षाला भेट दिली. यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नविन सोना, कार्य केंद्राचे संचालक डॉ. भालचंद्र चव्हाण आदी उपस्थित होत. यावेळी डॉ. चव्हाण यांनी राज्यातील परिस्थीतीची माहिती दिली.

यावेळी त्यांनी पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी फोनवर बोलून त्यांच्याकडून पावसाची परिस्थिती जाणून घेतली. तसेच मुंबईत जिथे जिथे पाणी साचल्याच्या तक्रारी येत आहेत तिथे अतिरीक्त मनुष्यबळ तैनात करून लवकरात लवकर पाण्याचा निचरा होण्यासाठी पंप बसविण्याचे निर्देशही त्यांनी दिले. पुण्यात आणि राज्यात इतर ठिकाणी पडलेल्या पावसाचा आढावा घेतला. आष्टी पाथर्डी तालुक्यातील काही गावांना पुराच्या पाण्याने वेढल्याने त्यात ४० गावकरी अडकून पडले होते. त्यांना एनडीआरएफच्या मदतीने एअरलिफ्ट करून काढावे लागेल असे संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

त्यानुसार नाशिक वरून हेलिकॉप्टर बोलवून या अडकलेल्या लोकांना तत्काळ एअरलिफ्ट करून सुरक्षित ठिकाणी हलवावे असे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. तसेच छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्तांशी देखील त्यांनी या कक्षातून संवाद साधला. भारतीय हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी दिलेल्या हवामान अंदाजानुसार पावसाची परिस्थिती कशी राहणार आहे त्यानुसार आपत्ती नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाने दक्षता घेण्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले. गेल्या २४ तासात सचेत ॲपच्या माध्यमातून राज्यभरात पावसाचा अलर्ट देणारे ३५ कोटी मेसेज पाठविण्यात आल्याची माहिती, डॉ. चव्हाण यांनी यावेळी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!