निलंबीत पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अनिल देशमुख आणि आदित्य ठाकरे यांच्यावर केले ‘हे’ आरोप

मुंबई :- राजकिय वर्तुळात खळबळ माजवणारी बातमी समोर आली आहे.मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी ईडीकडे केलेले खुलासे सध्या चर्चेत आले आहेत. नुकत्याच ईडीने केलेल्या चौकशीत परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मला सचिन वाझेला पुन्हा सेवेत घेण्याच्या सूचना केल्याचा दावा ईडीकडे केला आहे.
त्याचबरोबर सचिन वाझेला सेनेत घेतल्यानंतर गुन्हे शाखेत महत्वाच्या पदावर नियुक्ती द्या, असंही आपल्याला सांगण्यात आलं होतं, असं परमबीर सिंह यांनी ईडीला दिलेल्या जबाबात म्हटलं आहे.
परमबीर सिंह ईडीला दिलेल्या जबाबात, ‘सीआययुमध्ये नियुक्ती दिल्यानंतर काही महत्वाच्या केसेस सचिन वाझेला सोपवण्यात आल्या. त्या केसेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अनिल देशमुख यांनी दिलेल्या सूचनेनुसार वाझेला देण्यात आल्या होत्या,असे म्हटले आहे.
याचसोबत, ‘टीआरपी घोटाळ्यातील अर्णब गोस्वामी यांचं प्रकरणही याचवेळी वाझेला सोपवण्यात आलं होतं, असंही सिंह यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर सचिन वाझे अनिल देशमुख यांना नियमित रिपोर्ट द्यायचा, त्यांना ब्रिफ करायचा. वाझेनं मला सांगितलं होतं की पुन्हा पोलीस दलात येण्यासाठी त्याच्याकडून अनिल देशमुख यांनी दोन कोटी मागितले होते, असा धक्कादायक खुलासाही परमबीर सिंह यांनी ईडीकडे केलाय.यावरून सध्या राजकिय वातावरण तापण्याची शक्यता आहे. विरोधक आता यावरून महाविकास आघाडीला लक्ष करण्याच्या तयारीत आहेत.