मुंबई

फेरीवालामुक्त परिसर करण्यासाठी अखेर गोरेगावातील संकल्प सहनिवासमधील जनता रस्त्यावर

इतकी वर्ष अनधिकृतरित्या बस्तान बसविलेल्या फेरीवाल्यांना उठविण्यास मुंबई महानगरपालिकेचे पी उत्तर कार्यालय हतबल

मुंबई :- फेरीवाल्याचे वाढते अतिक्रमण तसेच त्यांच्यामुळे मच्छरांचा वाढता प्रादुर्भाव यांच्या विरोधात स्थानिक लोकप्रतिनिधींकडे वारंवार तक्रारी करुनही प्रभावी अशी कारवाई करण्यात न आल्याने तसेच मुंबई महानगरपालिचा पी उत्तर विभागही हतबल झाल्याने संकल्प सहनिवासामधील रहिवाशांनी रस्त्यावर उतरुन संपुर्ण परिसर फेरीवालामुक्त करण्याची किमया करुन दाखवली. परिसर फेरीवालामुक्त झाल्याने रहीवाशांनीही सुटकेचा निश्‍वास टाकला आहे. यापुढे स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी हा परिसर फेरीवालामुक्त ठेवण्यासाठी या ठिकाणी ‘नो हॉकर्स’ झोन विभाग करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. 

गोरेगाव (पूर्व) या ठिकाणी नागरी निवारा परिषदेने वसाहती बांधल्या आहेत. या ठिकाणी संकल्प सहनिवास ही ११ इमारतींची वसाहत आहे. या वसाहतीलगतच मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत जनरल अरुणकुमार वैद्य हा मुख्य मार्ग आहे. याच मार्गावर विविध कंपन्यांची कार्यालये असणारे आयटी पार्क असल्याने या मार्गावर मोठ्याप्रमाणात वाहतुक सुरू असते. अशातच या रस्त्याच्या बाजुलाच फेरीवाल्यानी अनधिकृतरित्या आपले बस्तान बसविले. एवढे कमी होत म्हणुन की काय टेम्पोच्या सहाय्याने आपला व्यवसाय करणारे तसेच फेरीवाले दैनंदिन कचरा लगतच्या नाल्यात टाकत असे. अशातच मच्छि विक्रेत्यांच्या वाढत्या प्रस्थामुळे येथील नागरीक हैराण झाले होते. आधिक फेरीवाल्यामुळे मेताकुटीला आलेली जनता मच्छरांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हैराण झाली होती. 

यासंदर्भात संकल्प सहनिवासमधील रहिवाशांनी स्थानिक लोकप्रतिनिधी यांना भेटून तक्रार केली होती. एवढेच नव्हे तर मुंबई महानगरपालिकेच्या पोर्टलवर ऑनलाईन तक्रारीही केल्या होत्या. परंतु मनपाच्या पी उत्तर विभागाकडून कुठल्याप्रकारची प्रभावी कारवाई करण्यात आली नाही. एवढेच नव्हे तर कुणाकडूनही ठोस पावले न उचलता जनतेच्या तोंडाला पाने पुसरण्याचे काम लोकप्रतिनिधी व महापालिकेकडून करण्यात आले. वारंवार तक्रारी करुनही कारवाई करण्यात येत नसल्याने संकल्प सहनिवासमधील रहिवाशांमध्ये तिव्र असंतोष पसरला होता.

अखेर रहिवाशांनी उत्सफुर्तपणे रस्त्यावर उतरुन फेरीवाल्यांना हद्दपार करण्याचा ‘संकल्प’ केला. नुसता केला नाही तर संकल्प फेडरल, सांस्कृतिक मंडळ, संकल्प परिवार सभासद यांनी एकजुटीचे दर्शन घडवित परिसर फेरीवालामुक्त तर केलाच त्याचबरोबर परिसराची स्वच्छता करुन परिसरातील दुर्गंधी दुर करण्यासाठी फिनेल व टँकरच्या पाण्याने रस्ते धुतले. यापुढे स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी हा परिसर फेरीवालामुक्त ठेवण्यासाठी या ठिकाणी नो हॉकर्स झोन विभाग करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!