दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे काम आंतरराष्ट्रीय दर्जाचे असावे-मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांनी घेतला मास्टर कामाचा आढावा..

मुंबई : संगीताचा शास्त्रशुध्द अभ्यास, विकास, प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी सुसज्ज व अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असे मास्टर दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय मुंबई विद्यापीठांतर्गत स्थापन करण्यात येत आहे. हे महाविद्यालय स्थापन करण्यासंदर्भात अभ्यास करुन शासनास अहवाल सादर करण्यासाठी गठित केलेल्या समितीची आढावा बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या महाविद्यालयाचे काम आंतरराष्ट्रीय दर्जाचे असावे या दृष्टीने कामाचे नियोजन करण्यात यावे, अशा सूचना दिल्या.

वर्षा येथील समिती कक्षात या महाविद्यालयासाठी गठित केलेल्या समितीने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रस्तावित महाविद्यालयाचे सादरीकरण केले. यावेळी, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, आरोग्य मंत्री राजेश टोपे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक धनराज माने, तंत्र शिक्षण संचालक डॉ.अभय वाघ, ज्येष्ठ गायिका तथा समिती सदस्य श्रीमती उषा मंगेशकर, सदस्य सचिव राजीव मिश्रा, समन्वयक मयुरेश पै आदी मान्यवर उपस्थित होते.

आज झालेल्या सादरीकरणात महाविद्यालयाची जागा निश्चिती, इमारत आराखडा, प्रवेश परिसर, सर्व अध्यापन सामग्रीसह सुसज्ज हवेशीर वर्गकक्ष, मुख्य सभागृह, वर्तूळाकार प्रेक्षकागृह, लघु सभागृह, ओपन थिएटर, प्रदर्शन आणि कलादालन, भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर संग्रहालय, परिषद सभागृह, ध्वनी मुद्रण कलागृह, संगीत कलागृह, जॅमिंग हॉल, वसतीगृह, ग्रंथालय, प्राध्यापक विश्रामगृह तथा अतिथी विश्रामगृह, शिक्षकवृंद, उपहारगृह सुविधा, दिव्यांग व असामान्य विद्यार्थ्यांसाठी उपाययोजना, संगीत महाविद्यालयात प्रवेशासाठी शैक्षणिक पात्रता, प्रयोजकत्वातून संगीत महाविद्यालयासाठी निधी उभारणे, करियरच्या संधी यासारख्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!