ब्रेकिंगमहाराष्ट्रमुंबईराजकीय

दिंडोशी-गोरेगावात शिवसेनेचा (ठाकरे गट) भगवा कायम! आमदार सुनील प्रभूंच्या बालेकिल्ल्यात भाजपचा ‘सुपडा साफ’

मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालात दिंडोशी आणि गोरेगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. आमदार सुनील प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली लढलेल्या या निवडणुकीत दिंडोशी आणि गोरेगावच्या जनतेने महायुतीला नाकारत ‘मशाल’ आणि ‘इंजिन’ला पसंती दिली आहे.

दिंडोशीत प्रभूंची जादू; सुहास वाडकर आणि तुळशीराम शिंदे विजयी
आमदार सुनील प्रभू यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या दिंडोशीत शिवसेनेने (उबाठा) आपले स्थान अधिक मजबूत केले आहे.
• प्रभाग ४१: येथून शिवसेनेचे (उबाठा) ॲड. सुहास वाडकर यांनी पुन्हा एकदा दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांच्या अनुभवावर मतदारांनी पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले.
• प्रभाग ४०: येथून तुळशीराम शिंदे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत भगवा फडकवला आहे.

गोरेगावात अंकित प्रभूंचा ऐतिहासिक विजय
गोरेगाव पूर्व परिसरात शिवसेनेने भाजपला मोठा धक्का दिला आहे. आमदार सुनील प्रभू यांचे सुपुत्र अंकित प्रभू यांनी प्रभाग ५४ मधून भाजपच्या विप्लव अवसरे यांचा तब्बल ११,१९७ मतांनी पराभव केला. या विजयाने गोरेगावात शिवसेनेची ताकद किती मोठी आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
गोरेगावमधील इतर महत्त्वाचे विजय:
• लक्ष्मी भाटिया (प्रभाग ५६): ११,४५५ मते मिळवून विजयी.
• जितेंद्र वळवी (प्रभाग ५३): शिवसेनेचे वर्चस्व कायम.
• विरेन जाधव (प्रभाग ५८ – मनसे): मनसेचे उमेदवार ८,१५५ मते मिळवून विजयी झाले, ज्यामुळे या भागात मनसेचाही प्रभाव दिसून आला.
ठाकरे आणि मनसेच्या प्रभावामुळे महायुती बॅकफुटवर
या निवडणुकीत दिंडोशी-गोरेगाव पट्ट्यात शिवसेना (उबाठा) आणि मनसेच्या उमेदवारांनी मिळवलेल्या यशामुळे भाजप आणि मित्रपक्षांना मोठा फटका बसला आहे.

“शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यावरील विश्वासामुळेच मतदारांनी हे आशिर्वाद दिले आहेत,” अशी प्रतिक्रिया आमदार सुनील प्रभू यांनी व्यक्त केली आहे.
कार्यकर्त्यांचा जल्लोष
निकाल जाहीर होताच दिंडोशी आणि गोरेगावात शिवसैनिकांनी आणि मनसे कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. “कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. विजयाचा गुलाल उधळत आणि फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्त्यांनी हा विजय साजरा केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!