मुंबईच्या बाहेरुन येणारे शिस्त बिघडवतायत- किशोरी पेडणेकर

मुंबई – सध्या पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने संपूर्ण जगभरात हाहाकार माजवायला सुरूवात केली आहे. तसेच राज्यासह मुंबईत सुद्धा कोरोनाच्या नव्या संसर्गाचे रुग्ण वाढत असतानाचे चित्र दिसून येत आहे. अशातच आता मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने झपाटयाने वाढ होत असल्याने मुंबई पोलिसांनी शहरामध्ये कलम १४४ लागू केलं आहे. आजपासून पुढच्या शुक्रवारपर्यंत म्हणजेच ७ जानेवारीपर्यंत हे आदेश लागू असतील असं पोलिसांनी सांगितलं आहे.
मुंबईमध्ये लागू करण्यात आलेल्या या आदेशामुळे आता पाचपेक्षा अधिक व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमता येणार नाही. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच मुंबईत नववर्षांच्या स्वागतानिमित्त मोकळया किंवा बंदिस्त जागेमध्ये पार्टी, स्नेहसमारंभ वा अन्य कोणत्याही उपक्रमाच्या आयोजनास बंदी करण्यात आली आहे. दरम्यान मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीदेखील मुंबईकरांना नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.
तसंच,’मुंबईच्या बाहेरुन येणारे मुंबईची शिस्त बिघडवतायेत,यापुढे असं चालणार नाही.सर्वांना नियम पाळणं बंधनकारक असेल.मुंबईकरांसाठी यंत्रणा सज्ज आहे, मात्र काळजी घ्यावी लागेल.कुणीही विनामास्क घराबाहेर पडता कामा नये’, असं आवाहन किशोरी पेडणेकर यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना केलं. मुंबईत नवा विषाणू असल्याची कोणतीही माहिती मिळालेली नाही असं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं आहे.