एसटी महामंडळाकडून दिवाळी सुट्टीत गावी, जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ५० टक्के सवलत

चिपळूण : दिवाळी सुट्टीत गावच्या दिशेने जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्याच्या प्रवासामध्ये ५० टक्के सवलत देण्याचे एस.टी. महामंडळाने जाहीर केले आहे. याचा निश्चित फायदा वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे. चिपळूण आगार प्रशासनाकडून तालुक्याती शाळा, महाविद्यालयात भेटी देत याबाबतची माहिती देत विद्यार्थ्यांकडून अर्ज देखील भरुन घेतले जात आहेत.
दिवाळी सणासाठीचे नियोजन आतापासून घराघरात सुरु झाले आहे. शैक्षणिकदृष्ट्या विचार करता सध्या शाळा, महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु असून त्या काही दिवसाने संपणार आहेत. त्यानंतर खऱ्या अर्थाने दिवाळी सुट्टी सुरु होणार आहे. सुट्टी कालावधी मोठा असल्याने साहजिकच विद्यार्थी आपपल्या गावच्यादिशेने जात असतात. विशेष म्हणजे महिलांसाठी यापूर्वीच एस. टी. प्रवास ५० टक्के सवलत दरात सुरु आहे. यामुळे दिवाळीसुट्टीत गावच्यादिशेने जाणाऱ्या विद्यार्थ्यामध्ये हा ५० टक्के सवलतीचा फायदा केवळ मुलांनाच होणार आहे.