तास न् तास टीव्ही पाहताय? आरोग्यावर होईल गंभीर परिणाम, वाचा!

स्मार्टफोन आल्यानंतर टीव्हीचे महत्त्व कमी होईल, असे वाटत होते. मात्र, तसे होताना दिसत नाही. आजही अनेक जण तास न तास टीव्ही पाहत असतात. मात्र, त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याचे एका अभ्यासातून समोर आलेय.ब्रिटनमधील ‘युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टल’मधील संशोधकांनी या विषयावर संशोधन केले. त्यात 40 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या सुमारे १ लाख ३१ हजार ४२१ लोकांना सहभागी करून घेतले होते. या लोकांना 4 तासांहून अधिक वेळ टीव्ही पाहण्यास सांगण्यात आले.
संशोधनातून धक्कादायक निष्कर्ष
संशोधनातून दीर्घ काळ टीव्ही पाहिल्यास ‘वेनस थ्रोंबेबोलिज्म’ (रक्ताच्या गाठी) हा विकार वाढत असल्याचे समोर आले. पायाच्या शिरांमध्ये रक्ताच्या गाठी बनण्याचा धोका वाढतो. त्या फुफ्फुसांपर्यंत पोहोचू शकतात, असे स्पष्ट झालेय. या अभ्यासाचे निष्कर्ष ‘युरोपीयन जर्नल ऑफ प्रिव्हेंटिव्ह कार्डियोलॉजी’ या नियतकालिकात प्रकाशित झाले आहेत.
यावर उपाय काय?
शारीरिक क्रियाशील असला, तरी दीर्घ काळ टीव्ही पाहिल्यास रक्ताच्या गाठी बनण्याचा धोका होऊ शकतो. टीव्ही पाहताना मध्ये ब्रेक घ्यावा. दर अर्धा तासाने उभे राहून स्ट्रेचिंग करावे. टीव्ही पाहताना ‘जंक फूड’ अथवा ‘फास्ट फूड’ खाऊ नये, असा सल्ला या अभ्यासाचे प्रमुख रायटर डॉ. सेटर कुनट्सर यांनी दिला.