कोंकणमहाराष्ट्रमुंबई

रा. वि. भुस्कुटे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित ! आदिवासींसाठी झटणारे डॉ. विजय साठे काळाच्या पडद्याआड ; ६९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

अनिल म्हात्रे

मुंबई : आदिवासी बांधवांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी आयुष्यभर अविश्रांत परिश्रम घेणारे डॉ. विजय पुरुषोत्तम साठे यांचे प्रदीर्घ आजाराने देहावसान झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ६९ वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी इंदवी तुळपुळे, मुले आदीम व चेतन सुना व नातवंडे असा परिवार आहे. डॉ. ॲड. विजय पुरूषोत्तम साठे रा. मुरबाड जिल्हा ठाणे यांनी आदिवासी जमातीच्या उत्थाना साठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले होते. वननिकेतन आणि श्रमिक मुक्ती संघटनेची स्थापना करून मुरबाड येथे ते कायमचे स्थायिक झाले. आदीम कातकरी आदिवासींच्या जीवन मरणाचे प्रश्न – वेठबिगार मुक्ती, विस्थापन व जमिनींचे प्रश्न इ. सोडविण्यासाठी ते आयुष्यभर कार्यरत राहिले. या कामासाठी वकीलाची गरज असल्याने  एल.एल.बी.चे शिक्षण घेऊन ते स्वतः वकील झाले. मुंबई विद्यापीठातून आदिवासींचे कायदे या विषयावर डॉक्टरेट मिळविली. तहहयात आदिवासींचे वकील म्हणून त्यांनी स्वतःला समर्पित केले. देशात जिथे कुठे आदिवासींचे प्रश्न निर्माण झाले तिथे जाऊन त्यांनी मदत केली आहे.

कायद्याचे सखोल ज्ञान असलेले डॉक्टर विजय साठे यांनी ठाणे – रायगड व इतर जिल्ह्यातील एकसाली जमिनींचे प्लॅाट आदिवासींना मिळण्यासाठी मुंबई  उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आणि शेवटी आदिवासींचा विजय झाला आणि एकसाली प्लॅाट मिळाले. विजय साठे आणि बन्सी घेवडे  यांनी संयुक्तपणे ‘कातकरी’ पुस्तकाचे लिखाण करून कातकरी ‘अकॅडमी ऑफ डेव्हलपमेंट सायन्सद्वारे’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आल्याने हा विषय जगासमोर आला. आदिवासींसाठी लढणारे वकिल ॲड. विजय साठे यांच्या विरोधकांनी खुनाच्या खोट्या केसमध्ये निष्कारण अडकविण्याचा प्रयत्न केला. पण ते निर्दोष असल्याचे सिद्ध झाले. आपल्या ज्ञानाचा उपयोग उपेक्षित आदिवासींच्या मुक्तीसाठी आणि उत्थानासाठी केला. त्यांनी जर स्वतःच्या फायद्यासाठी प्रॅक्टिस केली असती तर त्यांना अफाट धनदौलत कमवता आली असती. एक चारित्र्यवान कार्यकर्ता, अभ्यासू वक्ता, वकील, लेखक पत्रकार, कुशल संघटक  व संशोधक असे अनेक पैलू असलेले डॉ.विजय साठे यांनी आदिवासी व उपेक्षित घटकांच्या न्याय हक्कांसाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले.

आदिवासींच्या उत्थानासाठी डॉ. ॲड. विजय पुरूषोत्तम साठे यांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित करून केलेल्या कार्याची दखल घेऊन स्वातंत्र्यसैनिक रा. वि. भुस्कुटे स्मृती जीवनगौरव पुरस्काराने २०२४ साली त्यांना सन्मानित करण्यात आले होते. नामवंत दैनिकात अनेक लेख, कातकरी या पुस्तकाचे लेखक व इतर अनेक पुस्तिका, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या MSW चा अभ्यासक्रम विकसित करण्यात महत्वाची भूमिका आणि काही प्रकरणांचे लेखन त्यांच्या नावावर आहे. आदिवासी दलित महिला इत्यादी घटकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध झगडणारे डॉक्टर विजय साठे गेली ४-५ वर्षे आजारपणाशी झगडत होते. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आदिवासींचे उत्थानाची चिंता वाहणाऱ्या डॉक्टर विजय साठे यांची दिनांक १३ सप्टेंबर, २०२५ रोजी प्राणज्योत मालवली. शनिवार दि. २७ सप्टेंबर २०२५ रोजी निर्मला निकेतन कॉलेज ऑफ सोशल वर्क, न्यु मरीन लाईन्स चर्चगेट, मुंबई २० येथे सायंकाळी ४.०० वाजता अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी प्रा. रचना अडसुळे मोबाईल क्र. ९८२०४ ३६००६ यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!