ब्रेकिंगमंत्रालयमहाराष्ट्रशैक्षणिक

आता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मिळणार प्राधान्याने लस: मंत्री उदय सामंत

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री सामंत यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत

मुंबई: : कोविडच्या पार्श्वभूमीवर मागील अनेक दिवस महाविद्यालये ऑनलाईन पद्धतीने सुरू होती, आता ती ऑफलाइन पद्धतीने महाविद्यालये सुरू करण्यात येत आहेत. कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस झालेले विद्यार्थी ऑफलाईन उपस्थित राहू शकणार आहेत. त्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी व्यापक मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
मुंबईच्या सिडनॅहम महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी व त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात श्री. सामंत बोलत होते.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. सामंत म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागासोबत बैठक घेऊन, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी व्यापक मोहीम राबविण्यात येईल. या मोहिमेतून प्रत्येक महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला लस उपलब्ध होईल याची काळजी घेतली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
श्री. सामंत म्हणाले, ज्या विद्यार्थ्यांनी कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले आहेत. त्यांनी ही सामाजिक अंतर राखून, मास्क लावून वर्गात उपस्थिती लावावी. महाविद्यालयांनीही विद्यार्थी-पालक यांच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न करावा.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, ऑनलाईन – ऑफलाईन परीक्षा, कोरोनानंतरच्या काळातील नोकरीच्या संधी अशा विविध विषयांवर श्री.सामंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थी सुरक्षिततेची काय तयारी महाविद्यालयांनी केली आहे याची पाहणी त्यांनी केली आणि आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री.सामंत यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार व स्वागत केले. त्यानंतर प्राचार्य व शिक्षकेतर कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला सिडनॅहम महाविद्यालयाच्या प्राचार्य माधुरी कागलकर, उच्च शिक्षण विभागाच्या सह संचालक डॉ.सोनाली रोडे व विद्यार्थी उपस्थित होते.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी साधला आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद

मुंबई विद्यापीठ कलिना कॅम्पसच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या मागण्यांविषयी उद्या दुपारी ३ वाजता बैठक देखील श्री.सामंत यांनी बोलावली आहे.

आंबेडकर स्टुडंटस् असोसिएशनच्या वतीने विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कलिना कॅम्पसच्या प्रवेशद्वारावर बेमुदत धरणे आंदोलन साखळी उपोषण सुरू होते. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. सामंत यांनी यांसंदर्भात माहिती घेवून लगेच आंदोलक विद्यार्थांची भेट घेतली. त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या आणि त्यासंदर्भात उद्या मंत्रालयात बैठक घेणार असल्याचे जाहिर केले. उच्च व तंत्र शिक्षण संचालकांना विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत चौकशी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.सामंत म्हणाले, राज्यातील कुठल्याही विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी राज्य शासन तत्पर आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांविषयी सकारात्मक निर्णय घेऊ असेही श्री.सामंत यांनी सांगितले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!