हुश्श ! अखेर शालेय विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्टी वरील गंडांतर टळले …
शिक्षण विभागातील सावळ्या गोंधळाची पुन्हा एकदा प्रचिती

मुंबई:यावर्षी शाळांना उन्हाळ्याची सुट्टी मिळणार नाही, या बातमीमुळे हिरमुसलेल्या विद्यार्थी आणि पालकांना दिलासा देणारी बातमी आली आहे. वार्षिक अभ्यासक्रम पूर्ण झाला असेल तर एप्रिल महिन्यात विनाकारण शाळा सुरु ठेवण्याची गरज नसल्याचे स्पष्टीकरण राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी केले आहे.
ज्या शाळा कोविड काळात अभ्यासक्रम पूर्ण करू शकल्या नाहीत केवळ त्यांनाच एप्रिलमध्ये शाळा सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे मांढरे यांनी स्पष्ट केले आहे.
दर वर्षी प्रमाणेच या वर्षी देखील मे महिन्यात शाळांना उन्हाळी सुट्टी असणार आहे. पुढील वर्ष जूनच्या मध्यादरम्यान सुरु होणार असल्यानं शाळांना मे महिन्यात सुट्टी असेल. त्यामुळे मे महिन्यात सुट्टीचा कोणताही बेत आखला असेल तर तो बदलण्याची गरज नाही.
कोरोनामुळे शालेय विद्यार्थ्यांच झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शिक्षण विभागाने अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी उन्हाळी सुट्ट्या रद्द करुन एप्रिल महिन्यातही पूर्णवेळ वर्ग सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सोमवारी शिक्षण विभागाकडून देण्यात आली होती. शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनीच ही माहिती दिली होती. या बातमीनंतर विद्यार्थ्यांसह पालकवर्ग काहीसा नाराज झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आता याबाबत मांढरे यांनी सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे.
एकुणातच शिक्षण विभागाने गेली दोन वर्ष चालवलेली गोंधळात गोंधळा घालण्याची परंपरा कायम राखली आहे.