
चिपळूण:कोकणात महापुरामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी चिपळूण दौ-यावर आलेल्या उर्जामंत्री नितीन राऊत यांना गुरूवारी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पूरग्रस्तांच्या वीजबिलाविषयी छेडण्यात आले. मात्र, या प्रश्नाला बगल देत त्यांनी पत्रकार परिषद आटोपती घेऊन तेथून निघून गेले.
कोरोना परिस्थितीमुळे व्यापारी व शेतक-यांमध्ये वीजबिलाविषयी ओरड सुरू असतानाच आता महापुरात शेतकरी व व्यापारी नेस्तनाबूत झाल्याने वीजबिलाविषयी त्यांना दिलासा दिला जाणार आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. मात्र, या प्रश्नावर त्यांनी कोणतेही उत्तर न देता त्यांनी सभागृह सोडले. यावेळी पत्रकारांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत, अशी मागणी केली. त्यानंतर काही पत्रकारांनी त्यांना कोयनेतून मोठ्या प्रमाणात सोडण्यात येत असलेल्या अवजलाविषयी विचारणा केली. मात्र, त्यांनी तेथेही जलसंपदा विभागाकडे बोट दाखवून उत्तर देणे टाळले. याचवेळी कॉँग्रेसचे काही कार्यकर्ते येऊन पत्रकारांना अटकाव करू लागले. तसेच साहेबांचा मुड गेला असे बोलून पत्रकारांविषयी अवमानकारक वर्तन केले. या प्रकारानंतर येथील पत्रकार संघटनेने उर्जामंत्री राऊत यांच्या या वर्तनाविषयी तीव्र निषेध व्यक्त करत कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी दिलेल्या अवमानास्पद वागणुकीविषयी नाराजी व्यक्त केली.