प.महाराष्ट्र

बस्स झाले, आता पुरे..!’ म्हणत कोल्हापूरमधील व्यापाऱ्यांचा सोमवारपासून सर्वच दुकाने सुरू करण्याचा निर्णय

कोल्हापूर : कोरोना पॉझिटिव्हिटी रेट दहाच्या आत आला असतानाही निर्बंध शिथिल केले जात नसल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापार्‍यांच्या सहनशीलतेचा कडेलोट झाला आहे. त्यांनी थेट शासकीय आदेशाविरुद्ध बंड पुकारले आहे. पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांच्या आत असूनही जिल्ह्याला चौथ्या श्रेणीतील निर्बंध लागू केल्याने व्यापारी संघटनांनी ‘बस्स झाले, आता पुरे..!’ असे म्हणत सर्वच दुकाने सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. २८ जूनपासून सर्वच दुकाने सकाळी  ते दुपारी ४ या वेळेत सुरू राहणार आहेत. चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकार्‍यांची बैठक झाली. संजय शेटे यांनी शासन आदेशाची माहिती दिली.

ते म्हणाले, यापूर्वी पॉझिटिव्हिटी रेटच्या आधारे कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश चौथ्या टप्प्यात करण्यात आला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोल्हापूर दौर्‍यानंतर जिल्ह्यातील टेस्टिंगचे प्रमाण वाढवले. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांच्या आत आहे. पण राज्य शासनाने नवी नियमावली तयार करत पॉझिटिव्हिटी रेट काढताना आरटीपीसीआर चाचण्यांची आकडेवारी ध्यानात घ्यावी. अँटिजेन चाचण्यांचा दर आरटीपीसीआर चाचण्यांच्या दरात समाविष्ट करू नये, असे म्हटले आहे.

संजय शेटे म्हणाले, शासन असे वारंवार नियम बदलायला लागले तर आमची दुकाने कायमची बंद करायची का? व्यापार्‍यांची सहनशीलता संपली आहे. दुकाने बंद असूनही शासकीय कर, बँकांची देणी, कामगार पगार भागवायचे कसे, असा प्रश्न व्यापारी वर्गासमोर आहे.

शासनाला आजपर्यंत सहकार्य करत आलो आहे. पण शासन आमचा विचार करत नसेल तर संघर्षाची तयारी ठेवून दुकाने सुरू करावी लागतील. जिल्ह्यातील सर्व व्यापारी, अन्य दुकाने सुरू आहेत. आमची दुकाने कधी सुरू करणार, अशी विचारणा करत आहेत. शासनाने आपल्या आदेशाचा फेरविचार करावा, अशी मागणी लोकप्रतिनिधींकडे केली आहे. दरम्यान, राजारामपुरी व महाद्वार रोड व्यापारी असोसिएशननेही सोमवारपासून दुकाने सुरू करण्याचा निर्णय बैठकीत घेतला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!