मुख्यमंत्री अधिवेशनात उपस्थित राहण्याबाबत आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई – राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींमुळे या अधिवेशनात ठाकरे सरकार आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षामध्ये जोरदार वादावादी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चहापानाच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्यामुळे विरोधकांनी हाच मुद्धा उपस्थित करून आघाडी सरकारवर निशाणा साधला होता. तसेच प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी मुख्यमंत्री पदाचा चार्ज त्यांचे सुपुत्र आणि मंत्री आदित्य ठाकरे यांना घेण्याची विनंती केली होती.
मागच्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात छोटीशी शस्त्रक्रिया पार पडली होती. त्यामुळे आजारी असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या अधिवेशनामध्ये उपस्थित राहणार का, याबातत राजकीय वर्तुळातून तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आणि राज्य सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची तब्येत आणि त्यांच्या विधिमंडळातील उपस्थितीबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे.
आज अधिवेशनासाठी विधिमंडळात येताना प्रसारमाध्यमांनी आदित्य ठाकरेंकडे मुख्यमंत्र्यांची प्रकृती आणि अधिवेशनातील त्यांच्या उपस्थितीबाबत विचारणा केली होती. त्यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती उत्तम आहे. ते विधिमंडळाच्या अधिवेशनाला उपस्थित राहतील. मुख्यमंत्र्यांना योग्य वाटेल तेव्हा योग्य वेळी ते विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होतील, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.