ओमायक्रॉनची लागण प्रत्येकालाच होणार, बूस्टर डोसही संसर्ग थांबवू शकणार नाही; आरोग्य तज्ज्ञाची माहिती

नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून भारतात पुन्हा कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे सरकारने खबरदारीची पावले उचलत १५ ते १८ वयोगटातील मुलांचं लसीकरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
शिवाय आरोग्य कर्मचारी, पहिल्या फळीतील कर्मचारी आणि ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांना लसीचा बूस्टर देण्याची घोषणा केली गेली आहे. मात्र, हा बूस्टर डोस देखील लोकांना ओमायक्रॉनची लागण होण्यापासून रोखू शकणार नाही, असं मत एका आरोग्य तज्ज्ञाने व्यक्त केलं आहे.
आयसीएमआरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजीमधील वैज्ञानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष जयप्रकाश मुलायल यांनी माध्यमांशी बोलताना, ‘कोरोना हा आता भयानक आजार राहिलेला नाही. नवीन स्ट्रेनचा प्रभाव खूपच कमी आहे आणि खूप कमी लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येत आहे.
ओमायक्रॉन हा एक असा आजार आहे, ज्याचा आपण सामना करू शकतो. आपल्यापैकी अनेकांना याची लागण झाल्याचेही कळणार नाही.दरम्यान बूस्टर डोसही संसर्ग थांबवू शकणार नाही.कदाचित ८० टक्क्यांहून अधिक लोकांना कळणारही नाही की आपल्याला कधी ओमायक्रॉनची लागण झाली आहे.मात्र, बूस्टर डोस ओमायक्रॉन प्रभाव कमी करू शकतो’, असं त्यांनी सांगितलं आहे.