जलतरणपटू पूर्वा गावडे हिचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार…!

सिंधुदुर्ग नगरी- ओरोस येथील कुमारी पूर्वा संदीप गावडे हिने जलतरण क्रीडा क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केल्याबद्दल स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित मुख्य ध्वजारोहन कार्यक्रमात पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
पूर्वाचे वडील पत्रकार संदीप गावडे आणि आई रश्मी गावडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने हा पुरस्कार प्रस्तावित करण्यात आला होता.
पाच वर्षाची असल्यापासून कुमारी पूर्वाने पोहण्याचा सराव सुरु केला होता. त्यानंतर तिने जलतरण क्रीडा क्षेत्रात पदार्पण करत जिल्हा, विभाग ,राज्य व राष्ट्रीय पातळीवर यश मिळवलं. दिल्ली,गुजरात, ओडिशा, चेन्नई,गोवा,याठिकाणी झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत तिने दमदार कमगिरी करत हे यश मिळविले. विशेष म्हणजे दीव-दमण येथे झालेल्या ‘खेलो इंडिया ‘,’ओपन वॉटर सागरी जलतरण ‘स्पर्धेत १० किमी किलोमीटर आणि ५ किलोमीटर सागरी जलतरण स्पर्धेत दोन पदकं पटकावली. इतक्या लहान वयातच तिने जागतिक पातळीवर जलतरण क्रीडा स्पर्धेत झेप घेत सिंगापूर येथे अलिकडेच झालेल्या जागतिक सागरी जलतरण स्पर्धेत, भारताचे प्रतिनिधित्व केले आणि त्यातही घवघवीत यश संपादन केलं.
सिंधुदुर्ग जिल्हा आणि राज्याच्या दृष्टीने ही अभिमानास्पद बाब असून यानिमित्ताने तिला पालकमंत्री राणे यांच्या हस्ते गौरविण्यात आले





