धावत्या रेल्वेतून उतरणाऱ्या प्रवाशाच्या मदतीला धावला जवान, पाहा घटनेचा थरारक VIDEO

मुंबई: मुंबईतील खार रेल्वे स्थानकावर एक व्यक्ती अवैध पद्धतीनं रेल्वे रुळ ओलांडत होता. यावेळी रेल्वे स्थानकात कर्तव्यावर असलेल्या एका सुरक्षा दलाच्या जवानाने आपल्या जीवावर खेळून संबंधित प्रवाशाचा जीव वाचवला होता. त्या थरारक घटनेचा व्हिडिओही सीसीटीव्हीत कैद झाला होता. हे प्रकरणं ताजं असतानाच, मुंबईतील बोरीवली रेल्वे स्टेशनवर अशीच एक थरारक घटना समोर आली आहे.
एक्सप्रेस ट्रेनमधून प्रवास करणारा एक व्यक्तीनं रेल्वे प्लॅटफॉर्मवर पोहोचत नाही, तोपर्यंतच उतरण्याचा प्रयत्न केला. पण एक्सप्रेस ट्रेनच्या वेगाचा अंदाज न आल्यानं हा व्यक्ती थेट प्लॅटफॉर्मवर पडला. खाली पडल्यानंतर काही अंतर तो रेल्वेसोबत फरफटत पुढे गेला. संबंधित व्यक्ती रेल्वेच्या खाली जाणार तेवढ्यात बोरीवली रेल्वे स्थानकावर कर्तव्यावर असणारा आरपीएफचा जवान धावत आला. जवानाच्या प्रसंगावधानामुळे संबंधित प्रवाशाचा जीव वाचला आहे. ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून मोठी जीवितहानी टळली आहे.
#बोरीवली रेल्वे स्थानक!
एक्सप्रेस ट्रेनमधून प्रवास करणारा व्यक्ती धावत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करत होता. दरम्यान समतोल बिघडल्यानं तो खाली पडला आहे. pic.twitter.com/2OIPuYg9WX— Ravindra (@i_am_Ravindra1) June 30, 2021
खरंतर, सध्या लोकल आणि एक्सप्रेस ट्रेननं प्रवास करण्याची सामान्य नागरिकांना मुभा नाही. त्यामुळे बोटावर मोजण्याइतकेच लोकं सध्या रेल्वेनं प्रवास करत आहेत. अशात हा अपघात घडला आहे. बोरीवली रेल्वे स्थानकावर जर हा जवान नसता तर मोठी दुर्घटना घडली असती. जवानाच्या प्रसंगावधानामुळे संबंधित प्रवाशाचा थोडक्यात जीव बचावला आहे. संबंधित घटना आज सकाळी पावणे बाराच्या सुमारास घडली आहे.
या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती धावत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न करत आहे, पण पुढच्याच क्षणी हा व्यक्ती संतुलन बिघडल्यानं खाली कोसळला आहे. हा व्यक्ती रेल्वेसोबत फरफटत पुढे जाणार तेवढ्यात रेल्वे स्थानकातील जवान मदतीला धावत आला आहे. संबंधित प्रवाशाला जवानानं मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं आहे.