महाराष्ट्र

शिवसेनेचा ‘हा’ आमदार लवकरच जाणार जेलमध्ये; भाजप नेत्याचा दावा!

मुंबई : राज्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून वारंवार स्वबळाचा नारा दिला जात असताना आता शिवसेनेमधूनच भाजपासोबत पुन्हा युती करण्यासाठी मागणी केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींपासून लांब असणाऱ्या आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात प्रताप सरनाईक यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना कमकुवत करत असल्याचा दावा करतानाच भाजपाशी जुळवून घेण्याचं आवाहन केलं आहे.

प्रताप सरनाईक यांच्या या ‘लेटरबॉम्ब’मुळे आता अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. आमदार प्रताप सरनाईक यांना जेलमध्ये जाण्याची भीती वाटत असल्याने त्यांनी हे पत्र लिहिल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

“शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक जेलच्या भीतीने चिंताग्रस्त दिसत आहेत आणि आता सरनाईकनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भाजपा यांच्याशी हातमिळवणी करावी अशी विनवणी केली आहे. सर्व घोटाळेबाज प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर जेलचे पाहुणे होणारच,” असे सोमय्या यांनी म्हटले आहे.

प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन पानांचे  पत्रं लिहून महाआघाडीत मित्रपक्षांवर टीका केली आहे. १० जून रोजी सरनाईक यांनी हे पत्र लिहिले आहे. सत्तेत असलेले राष्ट्रवादी-काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत आहेत. या स्थितीत मला पुन्हा एकदा आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेतलेले बरे, असे माझे वैयक्तिक मत आहे. निदान यामुळे प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या आपल्या सहकाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना होणारा नाहक त्रास तरी थांबेल अशी मागणी प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!