मिल्खा सिंग यांच्या निधनाने फरहान अख्तर भावूक,पोस्टमध्ये म्हणाला…
फरहानने 'भाग मिल्खा भाग' या सिनेमात मिल्खा सिंग यांची व्यक्तीरेखा साकारली होती.
मुंबई : भारताचे महान माजी धावपटू आणि ‘फ्लाईंग सिख’ अशी ओळख असलेले मिल्खा सिंग यांचे निधन झाले आहे. ते ९१ वर्षांचे होते. मोहालीतील एका रुग्णालयात मिल्खा सिंगiयांना दाखल करण्यात आले होते. कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना बुधवारी जनरल आयसीयूत ठेवण्यात आले. त्यानंतर मिल्खा सिंग यांना अचानक ताप आला. शिवाय त्यांच्या ऑक्सिजन पातळीतही घसरण झाली. आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
View this post on Instagram
मिल्खा सिंग यांच्या मृत्यूची बातमी कळताच देशभरातून शोक व्यक्त केला जातोय. बॉलिवूडमधील अभिनेता फरहान अख्तर याने देखील एक पोस्ट शेअर करत मिल्खा सिंग यांच्या निधनाचं दु:ख व्यक्त केलंय. फरहानने मिल्खा सिंग यांची बायोपिक असलेल्या ‘भाग मिल्खा भाग’ या सिनेमात मिल्खा सिंग यांची व्यक्तीरेखा साकारली होती.
फरहानने सोशल मीडियावर मिल्खा सिंग यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. यात तो म्हणाला, ” प्रिय मिल्खाजी, तुम्ही या जगात नाहीत हे स्विकारण्यासाठी अद्यापही माझं मन तयार नाही. कदाचित तुमच्याकडून मला मिळालेली ही ती एक जिद्द न सोडण्याची बाजू म्हणता येईल.
कधीही हार न मानण्याची बाजू…आणि सत्य हे आहे की तुम्ही आमच्यात कायम जीवंत राहाल. कारण तुम्ही खूप प्रेमळ, मोठ्या मनाचे आणि दयाळू व्यक्ती होता.तुम्ही तुमच्या कल्पना, तुमचं स्वप्न साकारलं. मेहनत, प्रामिणिकपणा आणि जिद्दीच्या जोरावर आकाशाला स्पर्श करणंही शक्य असल्याचं तुम्ही दाखवून दिलं.” असं फरहान त्याच्या पोस्टमध्ये म्हणाला आहे.
पुढे फरहान त्याच्या पोस्टमध्ये म्हणाला, “तुमचा आम्हा सर्वांच्या आयुष्यावर प्रभाव आहे. जे तुम्हाला एक पिता आणि मित्र म्हणून ओळखतात त्या सर्वांसाठी तुमचा सहवास म्हणजे खरं तर आशिर्वाद आहे आणि ज्यांना तुमचा सहवास लाभला नाही त्यांना तुमची कहाणी कायम प्रेरणा देईल. मनापासून प्रेम” अशा आशयाची पोस्ट शेअक करत फरहान अख्तरने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
फरहानने ‘भाग मिल्खा भाग’ सिनेमात मिल्खा सिंग यांची व्यक्तीरेखा साकारली होती. त्यामुळे मिल्खा सिंह यांच्या प्रवासाबद्दल त्याने जवळून जाणून घेतलंय. शिवाय सिनेमासाठी फरहानला मिल्खा सिंग यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं होतं.