चित्रपट अभिनेते जवाहर कौल यांच्या चौकाच्या नामकरणाला सर्व पक्षीय नेत्यांची उपस्थिती ही गौरवशाली बाब-मंत्री अस्लम शेख

मुंबई- कौल कुटुंबिय एक शिक्षण व समाजसेवेचे व्रत घेतलेले कुटुंब असून प्राचार्य अजय कौल ही सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारे व्यक्तिमत्त्व आहे. शिक्षण क्षेत्रात त्यांचे मोठे नाव असून सर्वांना मदत करणारे असे त्यांचा नावलौकिक आहे. त्यामुळे त्यांच्या आमंत्रणावरून सर्व राजकीय पक्षांचे नेते चित्रपट अभिनेते जवाहर ताराचंद कौल यांच्या चौकाच्या नामकरण सोहळ्याला एकत्र आले असे गौरवोद्गार राज्याचे मत्स्यव्यवसाय, बंदरे, वस्त्रोद्योग खात्याचे मंत्री व येथील कॉंग्रेसचे स्थानिक आमदार अस्लम शेख यांनी नुकतेच मालाड येथे काढले.देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काश्मीर मध्ये जन्मलेल्या जवाहर कौल यांनी मुंबईत येऊन अनेक दर्जेदार हिंदी चित्रपटांमध्ये काम करून आपल्या कामाचा ठसा उमटवला.
मालाड पश्चिम,मार्वे रोड येथील चौकाला जुन्या काळातील प्रसिद्ध चित्रपट अभिनेते व समाजसेवक जवाहर ताराचंद कौल यांचे नाव देण्याचा समारंभ नुकताच सर्वपक्षीय राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यावेळी मंत्री अस्लम शेख बोलत होते. यावेळी मुंबई भाजप अध्यक्ष व आमदार मंगलप्रभात लोढा,उत्तर मुंबईचे स्थानिक खासदार गोपाळ शेट्टी,प्रसिद्ध चित्रपट अभिनेते सुनील शेट्टी, स्थानिक नगरसेविका सेजल देसाई,आरोग्य समिती अध्यक्ष राजुल पटेल,बाजार व उद्यान समिती अध्यक्ष प्रतिमा खोपडे,भाजप उत्तर मुंबई प्रभारी रघुनाथ कुलकर्णी,उत्तर मुंबई भाजप अध्यक्ष गणेश खणकर,मालाड भाजप अध्यक्ष सुनील कोळी, युनूस खान,माजी आमदार अशोकभाऊ जाधव, माजी उपमहापौर अरुण देव,चित्रपट निर्मात्या शबनम कपूर आणि कौल कुटुंबिय भाजपा, शिवसेना कॉंग्रेस आणि इतर पक्षाचे कार्यकर्ते आणि सुमारे 3000 नागरिक, विद्यार्थी,शिक्षक यावेळी उपस्थित होते.

खासदार गोपाळ शेट्टी म्हणाले की,जवाहर कौल हे काश्मिरी पंडित होते.त्यांचे हिंदी सिनेमाला मोठे योगदान होते.अनेक चित्रपटांमधून त्यांनी प्रभावी भूमिका साकार केल्या.आणि आज त्यांचे नाव या चौकाला देऊन त्यांचा खऱ्या अर्थाने गौरव केला आहे.त्यामुळे येणाऱ्या पिढीला भारत देशाबद्धल आपलेपणाची भावना निर्माण होईल. अजय कौल यांच्या शिक्षणातील योगदानाचा फायदा सर्वसामान्य विद्यार्थ्यांना होण्यासाठी आपण दोघे एकत्र मिळून काम करूया अशी इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
चित्रपट अभिनेते सुनील शेट्टी म्हणाले की,जवाहर कौल यांनी 1945 साली चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली.आपली भूमिका प्रभावीपणे रेखाटतांना त्यांचा आवाज,शब्दफेक हे सर्व काही नैसर्गिक होते.त्यामुळे त्यांचे नाव येथील चौकाला देऊन त्यांच्या चित्रपट क्षेत्रातील योगदनाचा गौरव केला आहे. कौल कुटुंबाचे आपली जुनी मैत्री असून प्राचार्य अजय कौल यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

यावेळी जवाहर कौल यांनी अभिनेता म्हणून काम केलेल्या अनेक चित्रपटांच्या भूमिका विषद करणारी त्यांची चित्रफीत आणि पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.
चांगल्या कामासाठी राजकीय नेते भेदभाव विसरून एकत्र येतात.येथील चौकाचे जवाहर ताराचंद कौल असे नामकरण केल्याबद्धल प्राचार्य अजय कौल यांनी स्थानिक नगरसेविका सेजल देसाई आणि सर्व पक्षीय नेत्यांचे आभार मानले.तर येथील चौकाला जवाहर ताराचंद कौल यांचे नाव दिल्याबद्धल मी स्वतःला भाग्यवान समजते असे नगरसेविका सेजल देसाई म्हणाल्या.