अखेर भाजपने किरीट सोमय्यांचा त्या पायरीवर सत्कार केलाच

पुणे :- काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या संजय राऊतांविरोधात तक्रार करण्यासाठी पुण्यात गेले. त्यानंतर त्यांना महापालिकेच्या पायऱ्यांवर शिवसेनेकडून धक्काबुक्की करण्यात आली. त्यात जखमी झालेल्या सोमय्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आलं.
त्यानंतर हे प्रकरण पार दिल्लीपर्यंत गाजलं. एवढा गदारोळ झाल्यानंतर आज सोमय्या पुन्हा पुण्यात गेले होते. ज्या पायऱ्यांवर सोमय्यांना धक्काबुक्की झाली त्याच पायऱ्यांवर त्यांचा सत्कार करण्याचा घाट भाजपने घातला होता. मात्र, काँग्रेसकडून लगेच विरोधाची हाक देण्यात आली.
महापालिकेनेही सोमय्यांच्या सत्काराला परवानगी नाकारली. मात्र ज्या पायऱ्यांवर धक्काबुक्की झाली त्याच पायऱ्यावर भाजपने विरोध झुगारून सोमय्यांचा सत्कार केला आहे. आज सोमय्यांच्या स्वागताला भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. यावेळी गर्दी अनावर झाल्याने पोलिसांकडून सौम्य बळाचा वापर करण्यात आला. दरम्यान भाजपकडून यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं.






