महाराष्ट्रमुंबईराजकीय

लाडकी बहीण योजनेमुळे राज्यावर आर्थिक संकट; आनंदाचा शिधा, शिवभोजन योजना होणार बंद-मंत्री छगन भुजबळ

मुंबई : आधीच्या सरकारच्या काळात सुरू केलेल्या लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना मोफत वीज, आनंदाचा शिधा योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थाटन योजना यांसह अनेक लोकप्रिय योजनांची घोषणा केली होती. निवडणुकीनंतर सत्तेवर येताच आर्थिक चणचणींमुळे अनेक लोकप्रिय योजनांना कात्री लागण्यास सुरुवात झाली. एकूणच अशा योजनांवर मोठ्या प्रमाणावर निधी द्यावा लागत असल्याने आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या योजनांसाठी अन्य विभागांचा पैसा वळवला गेल्याने अनेक योजना या केवळ कागदावरच राहतात, असे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान गणेशोत्सवाप्रमाणेच आता दिवाळीत देखील सर्वसामान्यांना आनंदाचा शिधा देता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे, असेही ते म्हणाले.

भुजबळ पुढे म्हणाले की, लाडकी बहीण जी योजना आहे ती ३५-४० कोटींवर जाते. तेवढे पैसे आपल्याला काढायचे म्हटले की, सगळीकडेच याचा फटका बसतो. त्यामध्येच राज्यामध्ये प्रचंड पाऊस त्यामुळे शेतीची मोठी हानी झाली, त्यामुळे तिकडे देखील मोठ्या प्रमाणावर निधी द्यावा लागणार आहे. निश्चितपणे यामुळे निधीची ओढाताण होत राहणार आहे. लाडकी बहीण योजनेमुळे इतर गोष्टींना फटका बसत आहे. इतर काही गोष्टी करणे शक्य नाही. आमच्या विभागातर्फे दहा किलो तांदूळ आणि गहू वाटप केला जातो आणि ते वाटप आम्ही सुरू केलंय. ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरले, त्यांना सरकार पाच हजार रूपये मदत दिली जातेय. बाकी पंचनामे करून भारत सरकार निश्चितपणे मदत करणार आहे. परंतु शेतकऱ्यांचे प्रश्न अगोदर सोडवावे लागतील.

दरम्यान शिवभोजन थाळी योजनेच्या निधीसाठीही आम्हाला प्रयत्न करावे लागतात. वर्षाला १४० कोटी लागतात. आता ७० कोटी रूपये मंजूर झालेत. मंत्रिमंडळात निर्णय घ्यावा लागेल, काय करायचं? सर्वच विभागांना निधीची कमतरता निर्माण झाली आहे. कॅबिनेटमध्येही चर्चा झाली यावर. दादाही (अजित पवारही) बोलले की पैशांचे सोंग घेता येत नाही. सर्व मंत्र्यांच्या गाड्या विकल्या तरी पैसे निर्माण होतील का?” असा सवालही भुजबळांनी केला. शिवभोजन थाळीच्या निधीसाठी आम्हाला फार जास्त प्रयत्न करावे लागतात, हे खरं आहे. आनंदाच्या शिधाबाबत अर्थखात्याने स्पष्ट सांगितले की, यावेळी शक्य नाही.

३५० कोटी एका शिधेचा खर्च जातो. सर्व खात्यांना निधीची कमतरता झाली आहे हे मी सांगू शकतो. अजित पवारांनीही सांगितले की, पैशांचे सोंग करता येत नाही. पैसे वाढले की, कुठेतरी या गोष्टी घडतात आणि ओढाताण होते. दिवाळीमध्ये दिला जाणारा आनंदाचा शिधा यंदा मिळणार नसल्याने सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांना अगोदर मदत करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. यासोबतच लाडकी बहीण योजनेचा फटका इतर विभागांना बसत आहे. शिवभोजन थाळीचा पूर्ण निधी अजून मिळाला नसल्याची खंत भुजबळांनी बोलून दाखवली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!