गांधीधाम पुरी एक्सप्रेसला नंदुरबार स्थानकाजवळ भीषण आग

नंदुरबार- गांधीधाम पुरी एक्सप्रेसला नंदुरबार स्थानकाजवळ भीषण आग लागल्याची मोठी बातमी समोर आली आहे. गांधीनगरकडून पुरी कडे जाणाऱ्या गांधीधाम-पुरी एक्स्प्रेसच्या पॅन्ट्री बोगीला ही आग लागल्याचे समजते आहे.ही आग विझवण्यासाठी अग्निशमक दल शर्तीचे प्रयत्न करत आहे.
दिलासादायक बाब म्हणजे या आगीत कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. मात्र, पॅन्ट्री बोगीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आग लागल्याची माहिती लक्षात आल्याबरोबर रेल्वे प्रशासनाकडून आग लागलेल्या पॅन्ट्री बोगीला अन्य रेल्वे डब्यांपासून वेगळं करण्यात आले. प्रवासी डबे वेगळे करण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
दरम्यान सर्व प्रवासी सुखरूप असून पुन्हा रेल्वे वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्न करत आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली ही माहिती अद्याप समजू शकलेली नाही. अजूनही आग विझविण्याचे काम सुरू आहे. या आगीत प्राथमिक माहितीनुसार कुठल्याही व्यक्ती जखमी झालेला नाही.