ब्रेकिंग

मॉकड्रील दरम्यान झालेल्या अपघातात जखमी अग्निशमन जवान सदाशिव कार्वे यांचे निधन,महापौर किशोरी पेडणेकर यांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई- माटुंगा येथील भाऊ दाजी रोडवरील श्री. सिद्धी अपार्टमेंटसमोर मॉकड्रील दरम्यान झालेल्या अपघातात दि. २९ जानेवारी २०२२ ला तीन जवान जखमी झाले होते. त्यातील गंभीर जखमी श्री. सदाशिव कार्वे या अग्नीशमन जवानाचे काल दि.०३ फेब्रुवारी २०२२ रोजी निधन झाले होते.

भायखळा येथील अग्निशमन दलाच्या मुख्यालयात आज दि.०४ फेब्रुवारी २०२२ रोजी जवानाचे पार्थिव मानवंदना देण्यासाठी व अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भायखळा मुख्यालयात ठेवण्यात आलेल्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले तसेच मुंबईकरांच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

अग्निशमन दलाच्या वतीने सदर जवानाला मानवंदना देण्यात येऊन पार्थिव नातेवाईकांच्या सुपूर्द करण्यात आले.सदाशिव कार्वे यांना या अपघातात आपला पाय गमवावा लागला होता. त्यांच्यावर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सायन रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु त्यांची काल दि.०३ फेब्रुवारी २०२२ रोजी प्राणज्योत मालवली.

या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश प्रमुख अग्निशमन अधिकाऱ्यांनी उपप्रमुख अग्निशमन अधिकाऱ्यांना यापूर्वीच दिले आहे.याप्रसंगी प्रमुख अग्निशमन अधिकारी श्री. हेमंत परब तसेच अग्निशमन दलाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!