मोफत लसीकरणावरून महाविकास आघाडीत श्रेयवादावरून लढाई
मुंबई: महाराष्ट्रात १ मे पासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोविडची लस मोफत दिली जाणार आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसनं अचानक तशी घोषणाच करून टाकली. त्यामुळं काँग्रेस संतप्त झाली आहे. काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्टपणे ही नाराजी बोलून दाखवली आहे. याबाबतची घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी स्वत: करावी अशीही मागणी केली आहे.
राज्यातील १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत लस देण्यात यावी, अशी काँग्रेसची स्पष्ट भूमिका आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी स्वत: त्यासाठी आग्रह धरला आहे. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडं तसा आग्रह धरला आहे. त्यावर मुख्यमंत्री सकारात्मक निर्णय घेतील असा आम्हाला विश्वास आहे. त्याबाबत ते विचार करत असताना श्रेय घेण्यासाठी कोणी परस्पर घोषणा करत असेल तर ते योग्य नाही. ते आम्हाला आवडलेलं नाही, आम्ही निश्चितच नाराज आहोत,’ असं बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं आहे.
राज्य सरकारकडून नागरिकांना मोफत लस देण्यात येणार असल्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी काल दिले होते. चांगली लस उपलब्ध व्हावी म्हणून जागतिक टेंडर काढण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली होती. तर, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही या संदर्भात ट्वीट केलं होतं. मात्र, काही वेळातच त्यांनी हे ट्वीट डिलिट केलं. हा निर्णय अधिकृत धोरण समितीद्वारे घोषित केला जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. यावरून महाआघाडीतील गोंधळ व मतभेद समोर आले आहेत. काँग्रेसनं तर आपली नाराजी उघड बोलून दाखवली आहे.
‘१८ वर्षांच्या वरील नागरिकांच्या लसीकरणाला परवानगी देण्यात आल्यामुळं लसीकरण केंद्रांवर मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. ह्यातून गोंधळ उडून करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. याबाबत मी स्वत: मुख्य सचिवांशी चर्चा केली आहे. याबाबतीत एक धोरण ठरवावं लागेल’, अशी सूचना केल्याचं थोरात यांनी यावेळी सांगितलं.