जुन्या चाळींच्या पुनर्विकासासाठी मोफत कार्यशाळा ; मुंबई मराठी पत्रकार संघाचा उपक्रम

मुंबई : मुंबईतील जुन्या चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्न दिवासागणिक जटील होत चालला आहे. यासाठीच मुंबई मराठी पत्रकार संघ आणि एच. डी. गावकर सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जुन्या चाळी व गृहनिर्माण सोसायट्यांच्या पुनर्विकास प्रक्रियेवर मार्गदर्शन करणारी मोफत कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
ही कार्यशाळा शनिवारी, ४ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ४.३० वाजता मुंबई मराठी पत्रकार संघाच्या आझाद मैदानाजवळील पत्रकार भवनाच्या सभागृहात होणार आहे. या कार्यशाळेत सर्व नागरिकांना मोफत प्रवेश असेल.
मध्य आणि दक्षिण मुंबईतील दादर, परळ, लालबाग, शिवडी परिसरात असलेल्या अनेक जुन्या चाळी व सोसायट्या पुनर्विकासाच्या टप्प्यावर आहेत. या प्रक्रियेत कायदेशीर मार्गदर्शन, पारदर्शकता आणि वाद टाळण्यासाठी योग्य माहिती मिळणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठीच या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स महासंघाचे तज्ज्ञ संचालक अॅड. श्रीप्रसाद परब (बी.ई.सिव्हिल, एल.एल.एम.) पुनर्विकास प्रक्रियेवरील कायदेशीर बाबींवर मार्गदर्शन करतील. तर ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम रहिवाशांची सामाजिक जबाबदारी या विषयावर विचार मांडतील. तसेच प्रश्नोत्तराचा विशेष सत्रही होणार आहे.
मुंबई मराठी पत्रकार संघ आणि एच. डी. गावकर सेवा संस्थेच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार, या कार्यशाळेद्वारे चाळी व सोसायट्यांचे सदस्य, प्रशासक, व्यवस्थापन समित्या तसेच इतर संबंधितांना उपयुक्त माहिती मिळून पुनर्विकास प्रक्रियेतील समान बंधुत्व व पारदर्शकता साध्य करण्यास मदत होणार आहे, अशी माहिती अध्यक्ष संदीप चव्हाण आणि कार्यवाह शैलेंद्र शिर्के यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.