मुंबई

राज्यासह देशभरात गणेशोत्सवाचा जल्लोष

मुंबई – गणेशोत्सवाचा जल्लोष आजपासून (७ सप्टेंबर) मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे. हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांपैकी एक असलेल्या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने घराघरात आणि सार्वजनिक मंडपांमध्ये गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली आहे. या सणामुळे महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांपासून ते शहरांपर्यंत मंगलमय वातावरण पसरले आहे. मुंबई, पुणे आणि कोकणातील घराघरात गणेशोत्सव खास पारंपरिक पद्धतीने साजरा होतो. कोकणात गणपती आगमनाला विशेष महत्त्व दिले जाते. तेथील घरोघरी रांगोळ्या, पारंपरिक पद्धतीने माटी बांधणे, नैवेद्य दाखवणे, भजनबाऱ्या, लहान मुलांची नृत्ये आणि महिलांच्या फुगड्या या साऱ्याचा आनंद द्विगुणित करतात. कोकणातील गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई आणि इतर शहरी भागांतील अनेक कोकणवासी आपापल्या गावात जाऊन सण साजरा करतात, जे कौटुंबिक एकत्रिकरणाचे प्रतीक आहे. गणेशोत्सवाच्या आधीच बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह शिगेला पोहचला होता.

गणपतीच्या पूजेसाठी आवश्यक दुर्वा, जास्वंद फुले, आभूषणे, आणि सजावटीच्या वस्त्रांसाठी बाजारपेठा गजबजल्या होत्या. विशेषतः दिव्यांच्या रोषणाईला प्रचंड मागणी होती, जिथे एलईडी दिव्यांची विक्री जोरात झाली. मुंबईतील लालबाग, परळ, दादर, आणि क्रॉफर्ड मार्केटसह प्रमुख बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी झाली होती. सार्वजनिक गणेश मंडळांनी १० दिवसांसाठी विविध सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे नियोजन केले आहे. यात रक्तदान शिबिरे, विविध स्पर्धा, सामाजिक विषयांवरील जनजागृती कार्यक्रम, आणि पथनाट्य यांचा समावेश आहे. गणेशोत्सवामुळे देशभरात मोठी आर्थिक उलाढाल होणार आहे. अंदाजे २५ हजार कोटींची उलाढाल अपेक्षित असून, २० लाखांहून अधिक गणेश मंडळे आहेत. फक्त मंडप सजावटीवरच १० हजार कोटी रुपयांचा खर्च होण्याची शक्यता आहे. या सणादरम्यान भारतीय वस्तूंना प्राधान्य दिले जाते, ज्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांनाही मोठा लाभ होतो. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून, सामाजिक एकात्मता आणि आर्थिक उलाढालीचा महत्त्वाचा सोहळा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!