महाराष्ट्रमुंबई

कोकणात काँग्रेस बंड थोपवण्यास गहलोतांचा पुढाकार

१२ जिल्हाध्यक्षांसोबत केली चर्चा

ठाणे – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला कोकणात बंडखोरीच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. कोकण, रायगड, ठाणे, आणि पालघर या जिल्ह्यांतील काँग्रेस पदाधिकाऱ्यांत नाराजी असल्याने बंडखोरीची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी मुंबईत १२ जिल्हाध्यक्षांशी चर्चा करत समजूत काढण्याचा प्रयत्न केला. महाविकास आघाडीतील एकजुटीसाठी काँग्रेस नेतृत्वाला कोकणातील मतभेद मिटवण्याचे आव्हान आहे.

ठाणे आणि कोकण पट्ट्यातील जागा वाटपात काँग्रेसला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्याने नाराजी पसरली आहे. मिरा-भाईंदर व भिवंडी पश्चिम वगळता, अन्य महत्त्वाच्या मतदारसंघांत काँग्रेसला संधी मिळाली नाही. कोकणातील राजापूर मतदारसंघात काँग्रेसचे अविनाश लाड हे शिवसेना आमदार राजन साळवी यांच्याविरोधात पुन्हा लढण्याच्या तयारीत होते, परंतु महाविकास आघाडीच्या रणनीतीत साळवी यांना पुन्हा संधी देण्यात आली. त्यामुळे लाड यांनी बंडाचा पवित्रा घेतला आहे. कल्याण पूर्व व ऐरोलीतही काँग्रेस नेत्यांमध्ये असंतोष आहे. परिणामी या उमेदवारांनी ठाकरेंच्या उमेदवारांविरोधात निवडणूक अर्ज दाखल केले आहेत.

या स्थितीत काँग्रेस नेतृत्वाने सोमवारी (२८ ऑक्टोबर) रात्री तातडीची बैठक बोलावली. या बैठकीत गहलोत यांच्यासह अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अविनाश पांडे, कर्नाटकचे गृहमंत्री गंगाधरैया परमेश्वरा, व कोकण प्रभारी बी एम संदीप यांनी काँग्रेस नेत्यांशी चर्चा केली. राहुल गांधी यांनीही काही जिल्हाध्यक्षांशी फोनवर संवाद साधला आणि नाराजी दूर करून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले.

काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी मित्र पक्षांच्या नेत्यांसोबत चर्चा करून निवडणूक कार्य सुरू करण्याची तयारी दाखवली आहे. तथापि अविनाश लाड यांनी गहलोत आणि राहुल गांधींच्या विनंतीनंतरही उमेदवारी मागे न घेण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!