महाराष्ट्रमुंबईराजकीय

घोडबंदरवासियांची वाहतूक कोंडीतून होणार मुक्तता-जड वाहने रात्री १२ नंतर सोडण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश

जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त महापालिका आयुक्तांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना

ठाणे : घोडबंदर रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत घोडबंदरवासियांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी रात्री उशीरा सर्व यंत्रणांची बैठक घेवून घोडबंदर रस्त्यावर रात्री बारा वाजलेनंतरच जड वाहने सोडण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी सर्व यंत्रणांना दिले. दरम्यान रात्री बारापूर्वी वाहने सोडणाऱ्या आणि वेळेच बंधन न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश समन्वय समितीचे अध्यक्ष व ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांना दिले.

घोडबंदर रोडवरील वाहतुक कोंडीमुळे तेथील नागरिकांना त्रास होत आहे. त्यांची या त्रासातून मुक्तता करणे हे अतिशय महत्वाचे असून घोडबंदर रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतुकीचे काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी ठाणे वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांना दिल्या. त्यासाठी वाढीव मनुष्यबळाची आवश्यकता असेल तर त्याचे नियोजन करण्यासही सांगितले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याचे जिल्हाधिकारी डॅा. श्रीकृष्ण पांचाळ यांना ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई पोलिस आयुक्त, पालघर जिल्हाधिकारी, पालघर जिल्हा पोलिस अधीक्षक, मीरा भायंदर पोलिस आयुक्त, मीरा भायंदर महापालिका आयुक्त यांच्याशी समन्वय साधून काम करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी त्यांनी जेएनपीटीकडून घोडबंदर रस्त्यावर येणारी वाहने रात्री १२ नंतरच सोडण्याच्या सूचना जेएनपीटीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक उन्मेष वाघ यांना दिल्या तसेच याबाबत नियोजन करण्याबाबत नवी मुंबईचे वाहतूक पोलिस उपायुक्त काकडे यांना सांगितले. त्याचबरोबर मीरा भायंदरचे पोलिस आयुक्त निकीत कौशिक, मीरा भायंदर महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा, पालघर जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड, पालघर जिल्हा पोलिस अधीक्षक देशमुख यांना दूरध्वनीवरून अहमदाबादकडून घोडबंदर रोडकडे येणारी वाहनेही रात्री १२ वाजलेनंतर सोडण्यात यावी अशा सूचना दिल्या. त्याबरोबर या जड वाहनांसाठी आच्छाड आणि चिंचोटी या ठिकाणी पार्किगची व्यवस्था करून जड वाहनांचे नियोजन करावे असे सांगितले.

या सर्व यंत्रणाच्या समन्वयाची जबाबदारी शिंदे यांनी ठाणे जिल्हाधिकारी पांचाळ यांच्यावर सोपविली असून यामध्ये वेळेचे बंधन न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या बैठकीला ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, वाहतूक पोलिस शाखेचे उप आयुक्त पंकज शिरसाट, पोलिस उप आयुक्त प्रशांत कदम आणि जस्टीस फॅार घोडबंदर रोडचे पंकज सिन्हा, गिरीष पाटील आणि ऍड. राधिका राणे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!