जनतेला घाबरवण्यासाठी करोनाची दुसरी तिसरी लाट मुद्दाम आणली जात आहे-राज ठाकरे
आता मंदिरे उघडण्यासाठी मनसे करणार आंदोलन..

मुंबई: करोनामुळे सणासुदीच्या काळात गर्दीवर नियंत्रण आणण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या असल्या तरी दहीहंडी साजरी करण्याबाबत भाजप आणि मनसेने आक्रमक पवित्रा घेत आज दहीहंडी उत्सव साजरा केला. पोलिसांनी नेत्यांसह मंडळांना नोटीस बजावून कारवाईचा इशारा दिल्यानंतरही मनसेकडून मुंबईसह ठाण्यात विविध ठिकाणी हंड्या फोडण्यात आल्या.
आज दुपारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. लॉकडाऊन आवडे सरकारला म्हणत सर्व गोष्टी सुरु आहेत, मग सणांवरच का येता? असा सवाल राज यांनी केला. हजारो कोटींची कामे वाजवली आणि आता कोणी मोर्चे काढू नयेत म्हणून तिसऱ्या लाटेचा घाट घातला जात आहे, असा आरोप राज यांनी केला आहे.
गेल्या वेळच्या आणि आताच्या परिस्थितीमध्ये खूप फरक आहे. लॉकडाऊन आवडे सरकारला अशी परिस्थिती झाली आहे. कोणतीही गोष्ट होऊ नये म्हणून पहिली, दुसरी तिसरी लाट मुद्दाम आणली जात आहे. यांच्या हाणामाऱ्या सुरु आहेत. भास्कर जाधवांच्या मुलाने मंदिरात अभिषेक केला. यांच्यासाठी मंदिरे उघडी आहेत बाकीच्यांनी मंदिरात जायचं नाही. यांनी वाटेल त्या गोष्टी करायच्या आम्ही दहीहांडी साजरी करायची नाही. माननीय बाळासाहेबांच्या नावाने हडप केलेल्या महापौर बंगल्यावरती बिल्डरांच्या गाड्या येणं काही कमी झालेल्या दिसत नाहीत. सरकारकडून कामे करुन घेण्यासाठी येणाऱ्यांच्या गाड्या कमी झालेल्या दिसत नाहीत. कुठेच काही कमी झालेलं नाही तर या सणांवरच तुम्ही कसे काय येता? त्यामुळे मी माझ्या महाराष्ट्र सैनिकांना जोरात दहीहंडी उत्सव साजरा करा जे होईल ते होईल असं सांगितलं होतं,” असे राज ठाकरे यांनी म्हटले. हे फक्त महाराष्ट्रात, मुंबईत का? बाकीच्या राज्यांच काय? जन आशीर्वाद यात्रा झालेली चालली. सण आला की लॉकडाऊन. म्हणजे सणांमधून रोगराई पसरते. यांच्या यात्रे, मेळाव्यांमधून नाही. यांना जे हवंय तेवढं वापरायचं आणि बाकीचं बंद करुन इतर जनतेला घाबरून ठेवायंच. त्यामुळे मी उत्सव साजरा करा असे सांगितले,” असे स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी दिले.
अलीकडेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहीहंडी मंडळांची बैठक घेत करोनामुळे दहीहंडी साजरी न करण्याचे आवाहन केले होते. मात्र मनसेने आक्रमक भूमिका घेत दहीहंडी उत्सव साजरा केला. बाळा नांदगावकर यांनी काळाचौकी येथील दहीहंडी फोडल्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांसह त्यांना ताब्यात घेतले.
दरम्यान आजपर्यंत दहीहंडी उत्सवाचे आयोजन न करणाऱ्या मनसेने बंदी काळात दहिहंडी फोडल्याने मनसेची दहीहंडी राजकीय असल्याचा आरोप होतो आहे.
साकीनाका, दादर, भांडुप, मुलूंड, काळाचौकी येथे मनसेने दहीहंडी फोडली. कुठे रात्री तर कुठे सकाळी सकाळी पोलिसांना हुलकावणी देत मनसेने ठिकठिकाणी दहिहंडी फोडल्या. मनसे नेते बाळा नांदगावकर यांना दहीहंडी फोडल्याबाबत पोलीसांनी अटक केली. मनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांवर बंदी आदेशाचे उल्लघंन केल्यामुळे गुन्हे दाखल झाले आहेत.
राज यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, ह्या लोकांची बाहेर पडायला फाटते, त्यामध्ये आमचा काय दोष, सध्या तुम्हाला कुठेतरी कोरोनाचा प्रभाव जाणवत आहे का? मग उगाच इमारती सील करण्याचा किंवा सणांवर निर्बंध लादण्याची गरज काय, असा सवाल राज यांनी केला.
जास्त थर रचू नका, असे सरकारकडून सांगितले जाते. थर लावायचे नाहीत तर मग दहीहंडी स्टुलावर उभे राहून फोडायची का? या सगळ्याला काही अर्थ नाही. त्यामुळे मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांना बाहेर पडून सण साजरे करण्यास सांगितल्याचे राज यांनी स्पष्ट केले.
ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त यांच्यावर फेरीवाल्याने सोमवारी जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणावर राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. महिला अधिकाऱ्यावर हल्ला करणारा आरोपी पोलिसांकडून जेव्हा सुटेल तेव्हा आमच्याकडून मार खाईल, असे ते म्हणाले.
मंदिरांच्या मुद्द्यावरूनही राज ठाकरे यांनी सरकारला सुनावले. ‘मंदिरे उघडली गेलीच पाहिजेत. आजचा दिवस जाऊ द्या. नंतर मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांची बैठका घेणार आहे. त्यात आम्ही याबाबत चर्चा करू. सगळी मंदिरे उघडलीच पाहिजेत नाहीतर सगळ्या मंदिरांच्या बाहेर घंटानाद करू,’ असा इशारा त्यांनी दिला.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मंदिरे उघडण्याच्या विरोधकांच्या मागणीला पाठिंबा देत मंदिरे उघडण्याची मागणी केली आहे. त्याबाबत राज यांना विचारले असता, ‘अण्णा इतके दिवस होते कुठे?’ असा थेट सवाल त्यांनी केला.
दहीहंडी साजरी करणाऱ्या मनसैनिकांवर गुन्हे दाखल होत आहेत यासंदर्भात विचारल्यावर, अस्वलाच्या अंगावर केस किती आहेत हे अस्वल किती मोजत नाही. त्याप्रमाणे आमच्या अंगावर केसेस आहेत. हे सर्व सुडबुद्धीने सुरु आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटले आहे.