नवाबाग समुद्रात मच्छीमारांच्या हाती,बांगडा माशाचा बंपर!
खरेदीसाठी मत्स्य खवय्यांनी केली एकच गर्दी..

वेंगुर्ले : येथील नवाबाग समुद्रात बांगडा माशाचा बंपर मच्छीमारांच्या हाती लागला. तो पाहण्यासाठी आणि खरेदीसाठी मत्स्य खवय्यांची एकच गर्दी उसळली. यामुळे खवय्यांची चांदी झाली तरी तेवढ्या प्रमाणात बर्फ न मिळाल्याने कवडीमोल किमतीने मच्छीमारांना या माशांची विक्री करावी लागली.
नवाबाग किनाऱ्यावरून मासे पकडण्यासाठी दररोज सायंकाळी समुद्रामध्ये एकाच वेळी नौका निघतात आणि मासेमारी करून त्या रात्री उशिरा किनाऱ्यावर येतात.सध्या मासेमारी हंगाम जोमात सुरू आहे; मात्र पाहिजे त्या प्रमाणात मासळी मिळत नव्हती. रात्री उशिरा मासेमारी करून नौका किनाऱ्यावर दाखल झाल्या. सगळ्याच नौकांना मोठ्या प्रमाणात बांगडा मासा मिळाला. काही नौकांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त मासा असल्याने यातील दोन नौका किनाऱ्यावरच रुतल्या. मच्छीमार बांधवांनी त्या नौका शिताफीने बाहेर काढल्या.बांगड्याचा बंपर लागल्याचे समजताच स्थानिकांनी किनाऱ्याकडे धाव घेतली. बांगडा जास्त असल्याने याच्या विक्रीचा प्रश्न निर्माण झाला. मच्छीमारांनी तो साठवण्यासाठी बर्फ शोधायला सुरूवात केली; मात्र पुरेशा प्रमाणात बर्फ नसल्याने अल्प किमतीत मासळी विकावी लागली. यामुळे मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले. कमी किमतीत मासे मिळाल्याने मत्स्य खवय्यांची मात्र चांदी झाली.