अभिनेता गोविंदा गोळी लागून जखमी : प्रकृती स्थिर
स्वतः ची रिव्हॉल्व्हर हाताळताना चुकून सुटली गोळी...

मुंबई – बॉलिवूड अभिनेता गोविंदा यांच्या पायाला गोळी लागल्याची घटना समोर आली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे. मंगळवारी सकाळी ४.४५ वाजता अभिनेत्याला त्यांच्याच रिव्हॉल्व्हरमधून गोळी लागली. अभिनेता इतक्या सकाळी लायसन्स रिव्हॉल्व्हर घेऊन कुठे जात होते? याबाबत आता अभिनेत्याच्या मॅनेजरने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
गोविंदा यांच्या मॅनेजरने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता आणि शिवसेना नेते गोविंदा कोलकत्त्याला निघाले होते. कोलकत्त्याला जाण्याआधी गोविंदा आपलं रिव्हॉल्व्हर त्यांच्या कपाटात ठेवत होते. त्यावेळी अचानक त्यांच्या हातातून रिव्हॉल्व्हर सुटलं आणि त्यातून निघालेली गोळी थेट त्यांच्या पायाला लागली.
स्वत:च्या बंदुकीतून चुकून गोळी सुटून ती पायाला लागल्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता गोविंदा जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे.त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया देखील पार पडली आहे. सध्या गोविंदा यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी काही कामानिमित्त घराबाहेर पडताना चुकून गोविंदा यांच्याकडून मिसफायर झालं. त्यांच्याकडे परवानाधारक पिस्तुल आहे. गाडीत बसताना गोविंदा यांच्याकडील पिस्तुलमधून चुकून गोळी सुटली आणि ती थेट पायात शिरली. त्यानंतर तात्काळ त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे. गोविंदा म्हणाले की, माझ्या पायातली गोळी आता काढून टाकण्यात आली आहे. आई वडिलांच्या आणि तुमच्या आशिर्वादाने माझी प्रकृती आता स्थिर आहे. डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे आणि तुमच्या प्रार्थनेमुळे मी यातून बाहेर पडू शकलो. सर्वांचे आभार.