
ठाणे: गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी सज्ज झालेल्या चाकरमान्यांच्या पायात जाचक अटींच्या साखळ्या घातल्यामुळे तीन महिन्यांपासून रेल्वे व बस बुकिंग करून बसलेल्या चाकरमान्यांच्या प्रवासात मोठे विघ्न निर्माण झाले आहे.
गेल्या वर्षी कोरोनाच्या साथीमुळे चाकरमान्यांना कोकणात जाण्यास अडथळे निर्माण झाले होते. यंदा कोरोनाची साथ कमी झाल्याने अनेकांनी तीन महिने आधीच रेल्वेचे आरक्षण केले होते. यावेळी गणेशोत्सवात कोणतेही विघ्न न होता गावी जायला मिळेल असा चाकरमान्यांचा अंदाज होता. मात्र २३ ऑगस्ट रोजी शासनाने नवीन अटी व नियम लादले. त्यामध्ये कोकणात जाण्यासाठी आरटीपीसीआर चाचणी प्रमाणपत्र आणि लसीकरणाचे दोन डोस झाल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असल्याच्या अटी घातल्या. त्यामुळे चाकरमान्यांच्या आनंदावर पाणी पसरले आहेत.
मुख्यमंत्री कार्यालयाने झटकली जबाबदारी
याबाबत कोकण रेल्वे प्रवासी संघाने मुख्यमंत्र्यांकडे निवेदन दिले होते. मात्र मुख्यमंत्री कार्यालयाने या प्रकरणी मदत व पुनर्वसन खात्याकडे बोट दाखवून आपली जबाबदारी टाळली आहे. त्यामुळे या टोलवाटोलवीत चाकरमान्यांचे हाल होत असून याबाबत योग्य तो निर्णय न घेतल्यास रेल्वेरोकोचा इशारा कोकण रेल्वे प्रवासी संघाने काल ठाणे येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे.