तामिळनाडूतील हेलिकॉप्टर दुर्घटनेतून बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांचं निधन

बंगळुरू:- संपूर्ण देशवासियांसाठी अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. तामिळनाडू येथे घडलेल्या हॉलिकॉप्टर दुर्घटनेत बचावलेले एकमेव जवान ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांचं दुर्दैवाने निधन झालं आहे. गेल्या आठवड्यात गुरुवारी घडलेल्या तामिळनाडूतील हेलिकॉप्टर दुर्घटनेत सीडीएस बिपिन रावत यांच्यासह त्यांची पत्नी आणि १३ जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याचदरम्यान या अपघातात ग्रुप कॅप्टन वरुण सिंग हे बचावले होते. मात्र,या दुर्घटनेत ते जबर जखमी झाल्याने त्यांच्यावर बंगळुरु येथील कमांड रुग्णालयात उपचार सुरु होते.
ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी संपूर्ण देशभरातून प्रार्थना केली जात होती. मात्र,आज अखेर त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. उपचारादरम्यान बंगळुरू येथील रुग्णालयात आज सकाळी त्यांचं निधन झालं आहे.
तामिळनाडू येथे घडलेल्या हॉलिकॉप्टर दुर्घटनेने संपूर्ण देश हादरला होता. सीडीएस बिपीन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि तब्बल १३ भारत मातेच्या वीर सुपुत्रांना वीरमरण आलं.अश्यातच या दुर्घटनेतून बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंग हे या दुर्घटनेत ४५ टक्के भाजले होते. त्यांच्यावर बंगलोर येथील लष्करी रुग्णालयात उपचार करण्यात येत होते.मात्र,आज दुर्दैवाने त्यांचं निधन झालं आहे.