कोंकण

सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील तीनही मतदारसंघावर भाजपचाच दावा – रवींद्र चव्हाण

कणकवली मतदारसंघ हा आमचा हक्काचा

सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघावर आम्ही दावा करणार असून महायुती मधील वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असे पालकमंत्री व भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी म्हटले आहे. कणकवली मतदारसंघ हा आमचा हक्काचा आहे पण कुडाळ मतदारसंघावरील दावा आम्ही सोडणार नाही. हा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत भाजपाच लढणार असे सांगून सावंतवाडी मतदारसंघातील वादावर लवकरच तोडगा काढू असे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे भाजपची जिल्हा कार्यकारणी सभा झाली त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. चव्हाण बोलत होते.

या पत्रकार परिषदेला कुडाळ मालवण मतदार संघाचे प्रभारी निलेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार अजित गोगटे, राजन तेली, जिल्हा चिटणीस रणजीत देसाई, संजू परब, विशाल परब, राजन म्हापसेकर उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की आमच्या महायुतीमधील शिंदे गट शिवसेनेने विधानसभा मतदारसंघावर जो दावा केला त्यात गैर काही नाही. प्रत्येकाला तो अधिकार आहे. कार्यकर्त्यांच्या भावना असतात. पण महायुती म्हणून जेव्हा वरिष्ठ नेते एकत्र येणार त्यावेळी कोणता मतदारसंघ कोणत्या पक्षाला मिळणारे स्पष्ट होणार आहे. सध्या आम्ही जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघावर दावा केला आहे. पण कुडाळ विधानसभा मतदारसंघ हा आमचाच असेल यात वाद नाही असे सांगून सावंतवाडी मतदारसंघाचे अंतर्गत वाद आहेत ते आम्ही मिटवू असे स्पष्ट केले. संघटनात्मक काम सुरू झाले आहे. 11 ऑगस्ट पर्यंत जिल्हास्तरीय अधिवेशन होणार असून त्यानंतर मंडलनिहाय बूथ शक्ती केंद्र अशा ठिकाणी अधिवेशन होणार आहे. महायुती म्हणून तिन्ही जागा जिंकण्याचा आम्ही संकल्प केला आहे, असे श्री. चव्हाण यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत साडेसहा हजार कोटी एवढा निधी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी दिला आहे. ती कामे सुरू आहेत. तसेच जिल्ह्यातील रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण विमानतळाच्या पार्श्वभूमीवर केले आहे. ज्या रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाची कामे पूर्ण झाली त्या रेल्वे स्थानकाच्या कामाचे उद्घाटन क्रांतीदिनी म्हणजेच ८ ऑगस्ट पासून टप्प्याटप्प्याने माजी केंद्रीय मंत्री व खासदार नारायण राणे यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती रवींद्र चव्हाण यांनी यावेळी दिली.

हे सरकार सर्वसामान्यांचे आहे त्यामुळे ११, १२ आणि १३ ऑगस्ट रोजी विविध विभागातील लोकांच्या असलेल्या समस्या सोडवण्यासाठी लोकशाही दिन घेण्यात येणार आहे. तसेच कबुलायतदार गावकर हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजप प्रयत्न करणार आहे आणि त्या ठिकाणच्या जनतेला न्याय मिळवून देणार आहे. असे पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी सांगितले.

मुंबई गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी कामे पूर्ण झालेली नाही त्यामुळे चाकरमान्यांना त्रास होत आहे. या रस्त्याची पाहणी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली. उर्वरित कामे गणेश चतुर्थी पूर्वी केली जाणार असल्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!