आ. नितेश राणेंच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार कायम !
अटकपूर्व जामिनावर उद्या होणार सुनावणी..

सिंधुदुर्ग: शिवसेनेचा कणकवलीतील कार्यकर्ता संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जाबाबत उद्या (बुधवारी) सुनावणी होणार आहे. आज मंगळवारी तब्बल चार तास याबाबत सुनावणी झाली. त्यानंतर कोर्टाने उद्या सुनावणी घेण्यात येईल, असे सांगितले. गेल्या दोन दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले नितेश हे वडील नारायण राणे यांच्यासोबत सिंधुदुर्गात उपस्थित झाले.
आमदार नितेश राणे यांचे वडील केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सोमवारी नागपुरातील सर्व कार्यक्रम रद्द करून कोकणात परतले. गोवा विमानतळावर नितेश आणि दोघे भेटल्यानंतर नारायण राणे यांनी ‘नितेश राणे यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, त्यामुळे ते अज्ञातवासात जाण्याचे कोणतेही कारण नाही,’ असे स्पष्ट केले होते.
दरम्यान आज दुपारी 3.30 वा जिल्हा प्रधान सत्र न्यायाधीशांसमोर राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली. नितेश राणेंच्या वतीने अँड.संग्राम देसाई यांनी बाजू मांडली. त्यांनी न्यायालयाला सांगितले की सर्च वॉरंट नसताना हॉस्पिटलमध्ये जात पोलिसांनी तपासणी का केली?आ. नितेश राणेंवर फक्त राजकीय स्वरूपाचेच गुन्हे दाखल आहेत.चौकशी दरम्यान नितेश राणे यांचा मोबाईल जप्त का नाही केला?
म्याव म्याव प्रकरणा नंतर राणेंना अडकवण्याचा हा प्रयत्न आहे.अजित पवारांकडून फिर्यादीचा सत्कार का केला ? सरकार पोलिसांवर दबाव टाकतय हे स्पष्ट दिसत आहे. आम्ही या प्रकरणात संपूर्ण सहकार्य करतोय.तपासाठी जी काही माहिती हवी होती ती पोलिसांनी चौकशी दरम्यान घेतली आहे. ऍड. संग्राम देसाई यांनी नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यासाठी जोरदार युक्तिवाद केला. तर माजी जी.प.अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या वतीने अँड राजेंद्र रावराणे यांनी युक्तिवाद केला.सरकारी वकील प्रदीप घरत व अँड भूषण साळवी यांनी सरकारी पक्षाच्या वतीने युक्तिवाद केला.यावेळी आ. नितेश राणे यांच्यावतीने अँड संग्राम देसाई,अँड राजेंद्र रावराणे,अँड.राजेश परुळेकर, अँड उमेश सावंत,अँड अविनाश परब,अँड प्रणिता पोटकर यांनी काम पाहिले.
जिल्हा सत्र न्यायाधीश एस व्ही हांडे यांच्यासमोर ही सुनावणी सुरू असून सरकारी पक्षा तर्फे युक्तिवाद अजून पूर्ण झालेला नसल्याने सदर सुनावणी उद्या बुधवार दि . 29 डिसेंबर रोजी दुपारी 2.30 वा.होणार असल्याचे समजते. यामुळे आ. नितेश राणे यांना अटकपूर्व जामीन मंजूर होतो आहे की त्यांच्यावर उद्याच अटकेची कारवाई होते याकडे सिंधुदुर्ग सहित संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहीले आहे.