
चिपळूण:संपूर्ण कोकणात रात्रभर कोसळणाऱ्या तुफान वृष्टीमुळे आणि ढगफुटीमुळे सर्वत्र महापूर सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. चिपळूण तर संपूर्ण जलमय झाले असून पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुरामुळे चिपळूण शहर जलमय झाले असून शहरातील बाजारपेठ, खेर्डीमध्ये सात फुटांपेक्षा जास्त पाणी शिरले असून अख्खी बाजारपेठ पाण्याखाली आहे. याशिवाय शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. मुंबई- गोवा महामार्ग, कराड रोड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तर शहरातील ब्रिटिशकालीन बहादूर शेख पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अनेक घरांमध्ये छपरापर्यंत पाणी आल्याने जवळपास ५००० लोक पाण्यात अडकले आहेत.
चिपळूण शहरातील जुना बाजार पूल आणि नवा पूल हे पूर्ण पाण्याखाली गेले असून दिसेनासे झाले आहेत. रात्रभर मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने याशिवाय कुंभार्ली घाट माथ्यापासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने पाणी शहरात आले आहे. वाशिष्टी, शिवनदीला आलेल्या पुराच्या पाण्याची पातळी आणखी वाढत आहे. पाणी वाढण्याचा वेग मोठा आहे.चिपळूण मधील पूर परिस्थिती ची दखल घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरीकडे रवाना झाले आहेत. मात्र, चिपळूणमध्ये जाण्यास कुठलाही मार्ग नसल्यामुळे परब आणि सामंत हे निवळीमध्ये अडकले असल्याची माहिती मिळत आहे. स्थानिक नागरिकांच्या मते 2005 पेक्षाही भयावह स्थिती निर्माण झाल्याचं उदय सामंत म्हणाले.
दरम्यान आपत्ती व्यवस्थापन विभाग, नगर परिषद, स्थानिक लोक, एनजीओ आणि कोस्ट गार्डकडून बचावकार्य सुरु करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री अनिल परब यांनी दिली आहे.