उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसते तर आज तुम्ही कुठे असता? शिवसेना खासदाराचा चव्हाणांना सवाल

राज्यात आघाडीचे सरकार सत्तेत असताना दुसरीकडे मात्र शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षात वाद होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशातच काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे अशोक चव्हाण यांनी सूचक विधान केले होते की, आमच्या पुढाकाराने महाराष्ट्रात सत्ता आली. आम्ही आहोत म्हणून आघाडीचे सरकार आहे, या काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या विधानावर शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनी प्रतिउत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर तुम्ही आज कुठे असता? असा प्रश्न उपस्थित करत हेमंत पाटील यांनी चव्हाणांवर जोरदार टीका केली आहे.
हेमंत पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले, ‘आम्ही आहोत म्हणून सरकार आहे असा कुणीही गर्व करू नये. महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेचे १०० टक्के नुकसान होत आहे. आमचा वापर केला जात असून, ही गोष्ट वरिष्ठ नेत्यांच्या कानावर घातली आहे. केवळ उद्धव ठाकरे यांचे आदेश आहेत म्हणून सगळे सहन करत आहोत’.
दरम्यान, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील चव्हाण यांच्या विधानाचे समर्थन केले होते. अशोक चव्हाण योग्यच बोलले. आघाडीत तीन घटकपक्ष आहेत. प्रत्येक पक्षाचे महत्त्व आहे. काँग्रेसचेही महत्त्व आहे. आम्ही आमच्या पद्धतीने काम करत आहोत. आमचे अस्तित्व तुम्ही पाहात आहात. आम्ही पंचायत समितीत नंबर वन आहोत. आमची संख्या कमी म्हणून आम्ही तिसऱ्या नंबरवर आहोत. आमचे मंत्री चांगलं काम करत आहेत, असं थोरात म्हणाले होते.