देशविदेशमनोरंजनमहाराष्ट्रमुंबईराजकीय

परदेशात निर्मित चित्रपटांवर १०० टक्के आयातशुल्क; ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयाबाबत हॉलीवूड निर्मात्यांमध्ये धास्ती!

न्यूयॉर्क : विविध देशांविरोधात पुकारलेल्या आयातशुल्क ‘युद्धा’त अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने आता परदेशी चित्रपट निर्मिती क्षेत्रावरही निशाणा साधला आहे. परदेशात निर्मित झालेल्या चित्रपटांवर अमेरिकेत १०० टक्के आयातशुल्क लागू करणार असल्याचा ट्रम्प यांनी सोमवारी पुनरुच्चार केला. या निर्णयाचा हॉलीवूडच्या चित्रपट निर्मिती क्षेत्राला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

यासंदर्भात ट्रम्प यांनी सर्वप्रथम मे महिन्यामध्ये इशारा दिला होता. याद्वारे ‘अमेरिकन फर्स्ट’ धोरणासाठी ट्रम्प यांनी आणखी एक पाऊल उचलण्याचे संकेत दिले आहेत. ट्रम्प यांनी स्वतःच्या ‘टूथ सोशल’ या समाजमाध्यमावर टाकलेल्या संदेशात म्हटले आहे की, अमेरिकेतील चित्रपट निर्मिती उ‌द्योग अन्य काही देशांनी अशा रीतीने चोरून नेला आहे, जसे एखाद्या लहान मुलीच्या तोंडातून कँडी पळवावी. मात्र हे धोरण कसे राबवणार, कोणती कायदेशीर यंत्रणा त्याची अंमलबजावणी करणार, याबाबत मात्र अजूनही अधिकृतपणे उलगडा करण्यात आलेला नाही. अमेरिकेच्या व्हाइट हाऊसनेही याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळले आहे. या धोरणामुळे चित्रपट निर्मितीचा खर्च नक्कीच वाढणार आहे आणि त्याचे ओझे साहजिकच प्रेक्षकांच्या खिशावर पडणार आहे, असे चित्रपट निर्मितीतज्ज्ञांचे मत आहे.

हॉलीवूडमधील चित्रपट निर्मात्यांचा सध्या कॅनडा, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियात करसवलतीसह उपलब्ध होणाऱ्या चित्रीकरण आणि चित्रपट निर्मिती सुविधा वापरण्याकडे अधिकाधिक कल आहे. त्यातही आशिया आणि युरोपातील सहनिर्मात्यांसह चित्रपट निर्मितीकडेही त्यांचा भर असतो. हे सहनिर्माते स्थानिक वित्तपुरवठादार मिळवून देणे, बाजारपेठ मिळवून देणे आणि चित्रपट वितरणाची साखळी निश्चित करणे, यासाठी हॉलीवूडच्या निर्मात्यांना मदत करत असतात. पण नव्या धोरणामुळे या सर्व साखळीलाच फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याबाबत वॉर्नर ब्रदर्स, डिस्कव्हरी, पॅरामाऊंट स्कायडान्स आणि नेटफ्लिक्स यांनी मात्र कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!