हिजाब प्रकरणावरून गृहमंत्री दिलीप-वळसे पाटलांनी केले राज्यातील जनतेला महत्त्वाचं आवाहन,म्हणाले…

मुंबई- कर्नाटकात तापलेला हिजाब विरूद्ध भगवा स्कार्फ हा वाद आता आधिक तीव्र होताना पाहायला मिळत आहे.अशात याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटत आहेत.याची गंभीर दखल घेत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्यातील नागरिकांना शांततेचं आवाहन केलं आहे.आपल्या ट्विटर अकांऊटवरून ट्विट करत दिलीप वळसे पाटील यांनी हे आवाहन केले आहे.
हिजाब प्रकरणाबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सर्वांना राज्यात शांतता राखण्याचे व सामंजस्यपूर्ण भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे.आपण अनावश्यकदृष्ट्या जाती-धर्मात तेढ निर्माण करायला लागलो तर समाजात एक दुही तयार होते. त्यामुळे दोन्ही बाजूंनी समजून घेतले पाहीजे. हिजाब समर्थनार्थ आणि विरोधात आंदोलन करू नये अशी भूमिका सर्वांनी घ्यायला हवी,असेही दिलीप वळसे पाटील म्हणाले.
राजकीय पक्षांनीही राज्यात विनाकारण अस्वस्थता निर्माण करून पोलिस विभागाचे काम वाढवू नये तसेच शांतता पाळण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंतीही गृहमंत्र्यांनी केली आहे.