महाराष्ट्रमुंबई

राज्यातील शिक्षकांच्या साठी आनंदाची बातमी

राज्यात शिक्षकांसाठी लवकरच धर्मवीर आनंद दिघे कॅशलेस शिक्षक कुटुंब आरोग्य कवच योजनेला तत्वतः मान्यता

सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश अबीटकर यांची ग्वाही आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या प्रयत्नांना यश
आयुक्त, सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षकांसाठी कॅशलेस आरोग्य योजना सुरू करण्यासाठी समिती गठित करण्याचा बैठकीत निर्णय

मुंबई : राज्यातील सर्व शिक्षक बांधवांच्या करिता लवकरच धर्मवीर कॅशलेस शिक्षक कुटुंब आरोग्य कवच योजना आणण्याची ग्वाही राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश अबीटकर यांनी आज बैठकीत दिली. ही योजना कशी असावी, निषक कसे असावेत याचा अभ्यास करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आयुक्त डॉ कादंबरी बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याचा निर्णय आज आरोग्य भवन येथे झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला.यासाठी पाठपुरावा करणाऱ्या उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलेले आहे.

मुंबईत आरोग्य भवन येथे झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश अबीटकर, सार्वजनिक आरोग्य विभाग आयुक्त डॉ कादंबरी बलकवडे, सार्वजनिक आरोग्य विभाग प्रधान सचिव डॉ निपुण विनायक, महात्मा ज्योतिबा फुले योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अण्णासाहेब चव्हाण, शिक्षण विभागाचे सचिव एस. कावळे, माजी शिक्षक आमदार कपिल पाटील, उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख आरोग्यदूत मंगेश चिवटे, युवा व्याख्याते प्रा. गणेश शिंदे, एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा.डॉ.बापूसाहेब अडसूळ यांच्यासहित एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेचे शिष्टमंडळ उपस्थित होते.

राज्यातील सर्व शिक्षक बांधवांना कॅशलेस योजना लागू करावी यासाठी आरोग्यदूत मंगेश चिवटे यांनी एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेच्या माध्यमातून गेल्या वर्षभरापासून शिक्षणमंत्री श्री दादा भुसे आणि आरोग्यमंत्री प्रकाश अबीटकर यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता.आज त्यांच्या मागणीला राज्य शासनाच्या वतीने तत्वतः यश मिळाल्याबद्दल सर्व शिक्षक बांधवांच्या वतीने एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेचे प्रा. डॉ.बापूसाहेब अडसूळ यांनी आरोग्यदूत मंगेश चिवटे यांचे आभार मानले.

कशी असेल समिती? धर्मवीर आनंद दिघे कॅशलेस शिक्षक आरोग्य कवच योजना राज्याच्या सार्वजनिक विभागाच्या आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे मॅडम या समितीच्या अध्यक्ष असतील. मध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांच्या समवेत आरोग्य विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे. शिक्षण आयुक्त राहुल रेखावर यांच्यासहित शिक्षण विभागातील उच्चपदस्थ अधिकारी देखील समितीचे सदस्य असतील. उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख आरोग्यदूत मंगेश चिवटे , शिक्षक भारतीचे प्रा.सुभाष मोरे यांचा देखील या समितीत समावेश असणार आहे.

पुढील तीन ते चार महिन्यात ही समिती राज्यभरातील शिक्षक प्रतिनिधींना भेटणार असून व्यापक स्वरूपातील एक योजना साकारण्यासाठी मेहनत घेणार आहे. धर्मवीर आनंद दिघे शिक्षक कुटुंब कॅशलेस आरोग्य योजनेअंतर्गत राज्यातील सर्व शिक्षक बांधवांना मोफत शस्त्रक्रिया व मोफत उपचार होतील असा विश्वास यावेळी उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख आरोग्यदूत मंगेश चिवटे यांनी व्यक्त केला. राज्यभरातील शिक्षकांच्या आरोग्यासाठी आपण सदैव कार्यतत्पर आहोत अशी ग्वाही यावेळी मंगेश चिवटे यांनी दिली. राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश अबीटकर साहेब यांनी शिक्षकांच्या योजनेसाठी तत्वतः मान्यता दिल्याबद्दल एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा डॉ बापूसाहेब अडसूळ यांच्यासह संघटनेच्या सर्व शिक्षक पदाधिकाऱ्यांनी आरोग्य मंत्री प्रकाश अबीटकर यांचा विशेष सत्कार करून आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!